ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर उतरले, मुंबईत शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव, पोलिसांनी केला लाठीचार्ज..

महाराष्ट्रातील अनेक भागात दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. या विद्यार्थ्यांनी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचा घेराव केला.

शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अभ्यास ऑनलाइन झाला असताना परीक्षा ऑफलाइन का घेतली जात आहे, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) यांच्या सांगण्यावरून ते जमले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी भाऊने आंदोलक विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तपासात तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ अटकपूर्व जामिनासाठी वकिलांचा सल्ला घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

हिंदुस्तानी भाऊ (विकास पाठक) नेमका काय म्हणाला?

‘मी कोणत्या पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेला नाही. मी माझ्या देशासाठी जेवढं होत तेवढं करतो. तसेच माझे तरुण आणि विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागते तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी उभा राहतो. तर यावेळेस तीन महिने ट्वीटवर कॅन्सल बोर्ड एक्झाम ट्रेंड होत आहे. हे सर्व मंत्र्यांपर्यंत पोहोचत होते, तरी सुद्धा सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही. नंतर सर्वांनी मला मेसेज केला की, भाऊ तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आहोत. आम्हाला जे ऑनलाईन शिकवले जाते, ते शिक्षण पूर्ण झाले नाही. तसेच काही विद्यार्थ्यांनी आम्ही जीव देऊ वगैरे मेसेज केला आहे. त्यासाठी मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता की, प्लिज तुम्ही या मुलांचे ऐका. मुलं तुम्हाला मेल करतायत आहेत. ट्वीटरवर ट्रेंड सुरू आहे, यांना मदत करा. जर नाही मदत केली तर सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील,’ असे व्हिडिओद्वारे हिंदुस्तानी भाऊने (विकास पाठकने) सांगितले.
आता याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हिंदुस्तानी भाऊसोबत उद्या बैठक घेणार असून यामध्ये याबाबत काहीतरी निर्णय घेऊन असे, हिंदुस्तानी भाऊने (विकास पाठकने) सांगितले.

रविवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळेवर होणार असून ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले होते. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परीक्षेची वेळ वाढवून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ज्या काही मागण्या आहेत, त्यावर चर्चा होऊ शकते, आंदोलनाची गरज काय? माहिती न देता आंदोलन करणे चुकीचे असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. उद्या (१ फेब्रुवारी) महत्त्वाची बैठक घेऊन या विषयावर चर्चा करून समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे सर्व कार्यालयांमध्ये ऑनलाइन कामकाज सुरू आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासही ऑनलाइन केला जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला? या तर्काच्या आधारे ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी करत मुंबईतच नव्हे तर नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव येथेही शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या शहरांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!