घरातील भूत काढायचे सांगून ३ लाख रुपये घेऊन सुद्धा महिलेवर केला अत्याचार..
औरंगाबाद शहरातील संतापजनक प्रकार; भोंदू हकिमाला बेड्या!
सध्या आपण सर्व नागरिक एकविसाव्या शतकात वावरत आहोत, या युगाला विज्ञानाचे युग असे सुद्धा मानले जाते..
पण या विज्ञानाच्या युगात सुध्दा अनेकजण भूत, प्रेत, करणी, भानामती, आत्मा, अंगात येणे अशा निरर्थक गोष्टींना अनन्य साधारण महत्व देतात, आणि यातूनच भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतात. अशीच एक घटना औरंगाबाद शहरातील बेगमपुरा भागात राहणाऱ्या महीलेबरोबर घडल्याची समोर आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला काही दिवसांपासून डोकेदुखीचा खूप त्रास होता. औरंगाबाद शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही तिचा त्रास काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे सदर महिलेला तिच्या जवळच्या नातेवाईकाने मालेगावचा एक हकीम बाबा रहेमानिया कॉलनी मध्ये उपचार करत असल्याचे सांगितले.
डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला 27 जुलै रोजी आरोपी मुश्ताक याच्याकडे गेली. त्यानंतर भोंदू हकीम मुश्ताक पीडितेच्या घरी गेला.
भोंदू मुश्ताकने पीडित महिलेच्या घरावर आत्म्याचा प्रभाव असून तिच्यामुळेच तिची डोकेदुखी कमी होत नाहीये असे सांगितले, व घाटावरून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी तीन कस्तुरी खरेदी करावी लागेल, यासाठी 3 लाखांचा खर्च येईल असे सुद्धा सांगितले.
2 ऑगस्ट 2020 रोजी महिलेने भोंदू मुश्ताकला कस्तुरी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये दिले. त्यानंतर 15 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी उरलेले एक लाख रुपये दिले.
नंतर आरोपी मुश्ताक ने पीडितेला खोलीत नेत तिच्या वरील आत्म्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तिच्यावर एकांतामध्ये उपचार करावे लागतील, असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले.
त्या नंतर भोंदू मुश्ताकने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला. पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर मात्र पीडितेला हा प्रकार समजला.
सदर महिलेने 7 डिसेंबर 2021 रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, भोंदू हकीम मुश्ताक फरार झाला होता. अखेर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, तपास अधिकारी विशाल बोडखे यांनी शोध घेत त्याला अटक केली.