औरंगाबादेत घुमला शिवरायांच्या नावाचा जयघोष, छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण; क्रांती चौक उजळून निघाला…

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात ठिकठिकाणी साजरी केली जात आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसत आहे. शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करणयात आहे. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी बनविला आहे. महाराजांची मूर्ती इतकी सुबक की बघत राहावे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केवळ औरंगाबादकरच नाही तर आसपासच्या भागातूनही अनेक जण आले होते. पुतळा अनावणाच्यावेळी जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना करत होते.

यावेळी क्रांती चौक परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता. या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं. शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती.

असा पार पडला सोहळा

सायंकाळपासून शिवप्रेमी क्रांती चौकात या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते. पुतळा अनावरणाची वेळ बारा वाजताची ठरलेली असली तरी तेथे जमलेल्या शिवप्रेमींचा उत्साह पाहून रात्री ९ वाजताच्या सुमारास काहींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर झाकण्यात आलेला कपडा काढून टाकला आणि अनावरण झाल्याचे जाहीर केले.

तर महापालिकेने पुतळा अनावरणाच्या निमित्ताने क्रांती चौकात उभारलेल्या व्यासपीठावर रात्री १०.५० वाजेच्या सुमारास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह अन्य सर्व मान्यवरांचे आगमन झाले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्यासह सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून पुतळ्याचे लोकार्पण झाल्याची घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय यासह विविध जयजयकारांनी आसमंत दणाणून गेला. मोठी आतषबाजी झाली.

रयतेच्या राजाच्या पुतळ्याचे रयतेच्या हस्ते अनावरण

विशेष म्हणजे यावेळी महसूलमंत्री थोरात यांनी ‘रयतेच्या राजाच्या पुतळ्याचे अनावरण रयतेच्या हाताने झाले, यात कुणाला वावगे वाटण्याचे कारण नाही. उलट आम्हाला त्याचा आनंदच आहे’ असे सांगत झाल्या प्रकारावर पडदा टाकला.

३९ वर्षानंतर दुसऱ्यांदा अनावरण

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात ३९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. २१ मे १९८३ रोजी त्या पुतळ्याचे अनावरण अनावरण झाले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे शिवरायांचा पुतळा झाकोळला जात असल्याने या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी होत होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी महापालिकेने जुना पुतळा काढून नवा पुतळा बसविण्याची तयारी सुरु केली होती. विविध कारणांमुळे नवा पुतळा बसविण्यास तीन वर्षे लागली. त्यानंतर आज ३९ वर्षांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्या पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!