औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप..
औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराला शुक्रवारी पोलिसांनी अखेर अटक केली. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड याला कन्नड येथील घरातून अटक केली.
असा आहे 30:30 घोटाळा
डीएमआयसी, समृद्धी महामार्ग तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन, चिकलठाणा, करमाड आणि कन्नड या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना कोट्यावधी मध्ये मोबदला दिला आहे. अशा शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी 25 ते 30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. सुरुवातीला शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला मात्र तो मोबदला मागील एक वर्षापासून देणे बंद करण्यात आले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे या 30-30 घोटाळ्यांमध्ये अडकून गेले.
यापूर्वीही झाला होता गुन्हा दाखल
गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने काही महिन्यांपूर्वी बिडकीन पोलिसात एका महिला तक्रारदाराने आपली तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र महिलेने दुसऱ्या दिवशीच आपली तक्रार मागे घेतल्याने आरोपी संतोष राठोड यांना जामीन मिळाला होता. शुक्रवारी दौलत राठोड या तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर बिडकीन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि त्यावरून कृष्णा राठोड, पंकज चव्हाण आणि संतोष उर्फ सचिन राठोड यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 30 लाखांची फसवणूक केली अस तक्रारदाराने नमूद केलं होतं. त्यावरून रात्री उशिरा संतोष उर्फ सचिन राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर 30-30 नावाच्या योजनेत कोणाची फसवणुक झालेली असल्यास त्यांनी निर्भीड पणे समोर येवून पोलीस ठाणे बिडकीन येथे तक्रार दयावी असे पोलीस ठाणे बिडकीन यांचे कडुन जनतेला आव्हान करण्यात आले आहे.
30-30 नंबरच्या पॉश गाड्या, पैशांसाठी पोते!
ग्रामीण भागातील लोकांवर भुरळ टाकण्यासाठी संतोष राठोडने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्याचे बोलले जाते. 30-30 नंबरच्या आलिशान गाड्यांचा ताफा गावात येत, सुटा-बुटातले लोक योजनेसंबंधी माहिती सांगत. तसेच गावातील लोकांकडून जी रक्कम घ्यायचीय, ती केवळ रोकड पद्धतीचे घ्यायची, अशी त्यांची पद्धत होती. त्यामुळे या व्यवहाराचे कोणतेही लेखी पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. लोकांकडून घेतलेल्या पैशांवर याने अनेक विदेश वाऱ्याही केल्याचे सांगितले जात आहे.