मध्यरात्री मुलीचे अपहरण करून ऊसाच्या फडात लपला; नराधमाला पकडण्यासाठी शेतकऱ्याने पेटवला ऊस..
सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ऊस कामगारांची ३ कुटुंबे बैलगाडीमधून मुक्तेश्वर साखर कारखाना येथून शिवपूर याठिकाणी ऊस तोडण्यासाठी आली होती; शिवपुर हे वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते.
सदर कामगार पहाटे ३ वाजेच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले. यावेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या ६ आणि १० वर्षे वयाच्या २ मुलींना बैलगाडीत झोपवले व ऊस तोडण्यासाठी गेले असता ३:१५ वाजेच्या सुमारास आरोपी विष्णू उत्तम गायकवाड याने ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या बैलगाडीत झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण मुलींच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ऊसतोड कामगार यांनी गाडीकडे धाव घेतली.
तेव्हा त्यांच्या १० वर्षाच्या मोठ्या मुलीने एका अज्ञात व्यक्तीने लहान बहिणीला उचलून उसाच्या शेतात गेल्याची धक्कादायक माहिती दिली. यामुळे कामगारांनी मिळून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण रात्रीची वेळ असल्याने आरोपीला पकडणे कठीण जात होते.
तेव्हा ऊस मालक बाबासाहेब दुबिले यांनी धाडस दाखवत अख्ख्या ऊसाच्या फडलाच आग लावली, त्यामुळे अपहरण करणारा आरोपी विष्णू उत्तम गायकवाड जाळ्यात सापडला. यावेळी कामगारांनी आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर आरोपीचे हातपाय बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.