मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, दुधापाठोपाठ गॅस सिलिंडरही महाग, जाणून घ्या किती वाढले दर..
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना आणखी त्रास दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. एका अधिसूचनेनुसार, 1 मार्चपासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 105 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे मंगळवारपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,012 रुपयांवर जाईल. दरम्यान, 5 किलोच्या सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 569 रुपये असेल. मात्र, घरगुती सिलिंडरचे दर पूर्वीसारखेच आहेत, त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.
कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 105 रुपयांनी वाढून 2,089 रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत आता 105 रुपयांनी वाढून 1,962 रुपयांवर जाईल. चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2,185.5 रुपयांच्या तुलनेत 105 रुपयांनी वाढली आहे.
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर सुधारित केले जातात. एलपीजीच्या किमती वाढल्याने भारतातील व्यावसायिक क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होणार आहे.
फेब्रुवारीपूर्वी केवळ पाच महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती पाच वेळा वाढल्या आहेत. 1 नोव्हेंबरला आणि त्याआधी 15 ऑक्टोबरला किमती वाढवण्यात आल्या होत्या. अधिसूचनेनुसार घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.