उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.
उत्तरकाशीत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी या दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाचा अपघात झाला असून चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे आणि इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बारकोटला निघाले होते वाहन
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो वाहन गुरुवारी सायंकाळी जानकीछत्ती येथून बरकोटकडे रवाना झाले होते. रात्री यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ बसला साईड देताना हा अपघात झाला.
चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट खोल दरीत कोसळली.
10 जखमींना दरीत बाहेर काढण्यात यश
पोलीस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने बचाव कार्य राबवत चार मुलांसह दहा जखमी झालेल्या प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढले.
जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी माहिती देताना म्हटले की, यमुनोत्री येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.
मृतांची नावे (सर्व महाराष्ट्रातील रहिवासी)
▪️पूरण नाथ (वय 40) राहणार शिव दर्शन सीएचसी लि. पीएमजीपी कॉलनी महाकाली केल्स रोड, अंधेरी, (पूर्व) मुंबई.
▪️जयश्री अनिल कोसरे (वय 26) राहणार तुणसर, भंडारा, महाराष्ट्र.
▪️अशोक महादेव राव (वय 40) राहणार नागपूर, महाराष्ट्र.
जखमींची नावे
▪️प्रेरणा (वय 08) रा. महाराष्ट्र.
▪️अंजू अशोक (वय 04)
▪️बोदी (वय 10)
▪️प्रमोद तुलसी राम (वय 52)
▪️बाळकृष्ण जितू (वय 41)
▪️लक्ष्मी बाळकृष्ण कोसरे (वय 46).
▪️दिनेश (वय 35)
▪️मोनिक (वय 24)
▪️क्रिशिता (वय 15)
▪️रचना (वय 38)