औरंगाबादेत लग्नोच्छुक मुलांना फसवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 1 महिला अटकेत…
संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये पोलिसांनी लग्नोच्छुक मुलांना फसवणाऱ्या मोठं रॅकेट उघड केलं असून लग्नाला मुली मिळत नसलेल्या मुलांना मुलगी दाखवायची, मुलाला मुलगी पसंत पडली की मग मुलीची खोटे नातेवाईक जसे की मावशी, मामा आणि इतर नातेवाईक भाड्याने उभे करायचे. मुलीचा सौदा लाखोंत ठरवायचा, आणि का एकदा लग्न झाले की, मग नवऱ्या मुलीने अंगावरील आणि घरातले दागिने घेऊन पळून जायचे. या तऱ्हेने या टोळीचे काम सुरू होते. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी या रॅकेटमधील एक महिला लताबाई पाटील हिला जेरबंद केले असून मुख्य आरोपी व सूत्रधार अशाबाई बोरसे ही फरार आहे.
दौलताबाद किल्यावर फिरण्याच्या बहाण्याने लग्नाच्या चौथ्या दिवशीच नवरी आंगवरच्या दागिन्यांसह पसार झाल्या प्रकरणी ८ एप्रिल २०२२ रोजी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नवरी मुलगी ममता पाटील हिला अटक करून चौकशी केली असता तिने सांगितले की, लग्न लावून देणाऱ्या टोळीची आशाबाई प्रकाश बोरसे (रा. भडगाव, जि. जळगाव) ही मुख्य आरोपी असून तिला लताबाई राजेंद्र पाटील रा. जळगाव) या महिलेने मदत केल्याचे स्पष्ट झाले होते.
दौलताबाद पोलीस दोघींच्या शोधात असताना त्यांना ६ जुलै २०२२ रोजी लताबाई बोरसे ही महिला जळगावमध्ये असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसांनी जळगाव गाठत लताबाईला ताब्यात विचारपूस केली असता टोळीची मुख्य सूत्रधार आशाबाई असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने आशाबाईला पकडण्यासाठी भडगाव गाठले मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच अशाबाईने पळ काढला होता.
पोलिसांनी लताबाईला घेऊन दौलताबादला आल्यावर सखोल तपास करत त्यांना ही टोळी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून गुजरातमध्ये सुध्दा या टोळीने अशाच पद्धतीने अनेक लग्नाळू मुलांना फसविल्याचे तपासत निष्पन्न झाले. शिवाय या टोळीने ५० पेक्षा जास्त तरुणांना फसविले आहे. पोलिसांचे अनेक पथक या टोळीची मुख्य सूत्रधार महिला आशाबाई बोरसे हिच्या शोधत आहे.