संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा..
अमरावतीत ४५ वर्षीय शेतकऱ्याला निर्दयीपणे मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात घटना वरूड तालुक्यामधील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे घडली आहे
प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यामधील नांदगाव येथील रहिवासी नंदकुमार बुरंगे (वय ४५ वर्षे) आणि आरोपी हे दोघे नातेवाईक असून त्यांच्या मध्ये शेताच्या रहदारीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, गुरुवार (३ जून) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तक्रारदार शेतकरी नंदकुमार बुरंगे शेतातून गावात येत असताना बबन बुरंगे आणि अन्य तिघे त्याच मार्गाने जात होते.
त्यावेळी बबन बुरंगेने नंदकुमार बुरंगे यांच्याशी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीनेही मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी नंदकुमार बुरंगे यांच्या तोंडात विष्ठा कोंबून ती खाण्यास भाग पाडले.
या प्रकरणी बबन आत्मारामजी बुरंगे (६० वर्षे), सुरेश आत्माराम बुरंगे (५० वर्षे), भूषण बबन बुरंगे (३२ वर्षे) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५० वर्षे, सर्व रा. नांदगाव, वरुड) यांच्या विरोधात तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध मारहाण, तसेच विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचा आरोप असल्यामुळे, ज्या कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आजाराचे संक्रमण होईल, असे कृत्य करणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणात अधिकची चौकशी करत आहेत.