थरारक! ओव्हरटेक करत असताना बसखाली आली मोटरसायकल अन् 45 प्रवाशांना घेऊन जाणारी धावती बस पेटली

कन्नड हून वैजापूरकडे जाणाऱ्या ST बसखाली मोटासायकल आल्यामुळे झालेल्या स्फोटात बसला आग लागल्याची घटना काल दुपारी 4:30 वाजता वैजापूर जवळील रोटेगाव पुलावर घडली.

यामध्ये मोटरसायकलस्वार संजय नारायण पवार (वय 40, कन्नड, वडारवाडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद मध्ये उपचार सुरु आहेत. तर बसमधील सर्व 45 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड येथून वैजापूरकडे जाण्यासाठी 45 प्रवासी घेऊन एक बस दुपारी निघाली होती. दरम्यान येवला तालुक्यातील आन्दूरसोल येथून लग्न आटपून संजय पवार हे कन्नड येथे परतत होते, वैजापूरजवळ असलेल्या रोटेगाव पुलावर 4:30 वा. सुमारास ओव्हरटेकच्या प्रयत्न करत असताना पवार यांची मोटरसायकल बसच्या समोरच्या चाकाखाली आली.

भरधाव मोटरसायकल बसच्या समोरच्या चाकाखाली अडकल्याचे कळताच चालकाने ब्रेक दाबले. मात्र, उन्हाळ्यात चाकाखाली घसरत गेल्याने मोटरसायकलची पेट्रोल टाकी फुटून स्फोट झाला. बसच्या समोरच्या बाजूला आग लागली.

बस मध्ये आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. प्रवाश्यांना माहिती देत चालकाने लागेच बस रिकामी केली. क्षणार्धात बस आणि बाईक आगीच्या वेढ्यात येऊन खाक झाली. बाईकस्वार संजय पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी येथे उपचार सुरु आहेत.

झालेल्या या घटनेमुळे रोटेगाव पुलावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. बसमधील सर्व 45 प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!