औरंगाबाद पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या..
गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलिस दलातील बदल्या कधी होणार याची चर्चा पोलिस आयुक्तालयात सुरू होती. अखेर बदल्यांचा मुहूर्त मंगळवारी सापडला असून शहर पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी काढले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयात परजिल्ह्यातून बदलीवर आलेल्या 30 कर्मचाऱ्यांनाही नियुक्ती मिळाली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.
वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आता हलवण्यात आले असून पोलिस आयुक्तालयामधी जवळपास 837 सहाय्यक फौजदार, पोलिस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 13 जणांच्या तर 21 कर्मचाऱ्यांना दंगा नियंत्रण पथक व QRT पथकात 1 वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. शिवाय 55 कर्मचाऱ्यांच्या दंगा नियंत्रण पथकातून इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये 99 वाहन चालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बृहन्मुंबई, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जालना आदी जिल्ह्यातून शहर पोलिस आयुक्तालयात बदलीवर आलेल्या 30 कर्मचायांपैकी 17 जणांना दंगा नियंत्रण पथकात तर 13 जणांना पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे.
दरम्यान, बदल्या झालेल्या कर्मचायांना नियुक्तीच्या ठिकाणी लगेच हजर होण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी दिले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी कळविली आहे.