1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..
काल राज्यभरात मनसेच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने मंदिरामध्ये हनुमान चालिसाचे पठण आणि हनुमान चालिसाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. तर राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये महाआरती करत हनुमान चालीसेचे पठण केले होते.
गुडीपाडव्याच्या सभेनंतर राज्यभरातील वातावरण तापले होते, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाले. यावर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत अधिक आक्रमक भूमिका घेतली. रमजानच्या महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्याने वातावरण तापले आहे.
राज्यात 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम देखील राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला होता. सांगायचे म्हणजे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा विषय अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आता औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहराकडे वळवला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हा जिल्हा, या जिल्ह्याने आणि शहराने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदेबरोबरच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थ्यांमध्ये सुद्धा औरंगाबाद मध्ये शिवसेनेला कायम यश मिळाले आहे. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वाधिक यश हे याच औरंगाबादमध्ये मिळाले होते. राज ठाकरे हे देखील त्याच पद्धतीने आपली वाटचाल करतांना दिसत आहेत.
आता शिवसेनेची धार बोथट झाली आहे, महाविकास आघाडी सोबत सत्तेमध्ये गेलेल्या शिवसेनेला प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतांना अडचण निर्माण होत आहे, हे लक्षात आल्यावर राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला आहे.
1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबादमध्ये मोठी सभा घेणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती त्याच मैदानावर राज यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय.