पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोयगाव तालुक्यातील घटना..
the-father-himself-abused-the-minor-daughter : स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून १६ वर्षीय पीडितेस जन्मदात्या सख्या बापानेच गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार पळसखेडा (ता. सोयगाव) मध्ये समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी नराधम बापाविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम बापास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन पीडितेची आई गर्भवती असल्याने माहेरी गेली असताना पीडित अल्पवयीन मुलगी तिचे वडील व आजीसोबत पळसखेडा येथे राहत होती. याचाच गैरफायदा घेत नराधम बापानेच स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. आणि यातूनच पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
ही बाब पीडितेच्या आजीच्या लक्षात आल्यावर तिने चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समजला. मात्र त्यानंतरही या बाबीची कुठेही वाच्यता न करता त्यांनी पीडित नातीचा गर्भपात गर्भपात करण्यासाठी नेले. मात्र गर्भपात करण्यासाठी आलेली मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांना शंका आली. त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश लोखंडे, प्रदीप कोळी यांच्यासह महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पीडितेची तिची विचारपूस केली. मात्र तिने आरोपीचे नाव सांगण्यास टाळाटाळ केल्यावर पोलिसांच्या पथकाने विश्वासात घेऊन तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याचे सांगताच पोलिस पथकाला धक्काच बसला.
पोलिसांनी तत्काळ पीडितेवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधम बापास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्यासह पथक करीत आहे.