विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; वैजापूर तालुक्यातील घटना..
वैजापूर: कन्नड तालुक्यात विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यामधील बायगाव शिवारामध्ये अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.
बुधवार दिनांक 20 जुलै 2022 रोजी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील बायगाव परिसरामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर पडून दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला झाला असून साहेबराव गणपत चेळेकर वय 70 वर्षे, आणि बाबुराव गणपत चेळेकर वय 57 वर्षे असे मृत भावांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साहेबराव गणपत चेळेकर आणि बाबुराव गणपत चेळेकर हे दोन्ही भावांचे एकत्रीत कुटुंब होते. दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने शेतामधील काम करण्यासाठी चेळेकर बंधू शेतात गेलेले होते. संध्याकाळी काम शेतातले काम संपवून मोठे बंधू साहेबराव चेळेकर हे लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे निघाले असता नेमकं तेव्हाच शेजारील शेतकऱ्याची विजेची तारेला खांबाचा आधार नसल्यामुळे खाली लोंबकळत असल्याने बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरून बैलासगट साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला.
भावाला वाचवण्याकरीता गेले आणि बाबुराव यांना सुद्धा मृत्यूने कवटाळले…
बैलगाडीत वीजप्रवाह उतरल्यामुळे घटनास्थळी जोरदार आवाज झाला. तो आवाज ऐकून लहान भाऊ बाबुराव चेळेकर हे मोठ्या भावाला वाचवण्याकरीता गेले मात्र याचवेळी त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. नंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी वीजेचा प्रवाह बंद करून दोघांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी शिऊर पोलिसांनी पाहणी करत तपास सुरु केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे चेळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.