छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे रात्री १०.०० ते १२.०० वाजे दरम्यान होणार अनावरण; अनावरणासाठी वाद्यांना परवानगी..

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दि. १८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणाली द्वारे रात्री १०:०० ते १२:०० वाजे दरम्यान अनावरण होणार आहे. या अनावरण सोहळ्यात रात्री विद्युत रोषणाई, फटाके, लाऊडस्पीकर, ढोल ताशे आणि संगीत वाद्य इत्यादींचा वापर लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे वेळ वाढवून देणे बाबत पत्र देण्यात आले होते.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विशेष अधिकारातून राखीव ठेवण्यात आलेल्या तीन दिवसांपैकी दि १८ फेब्रुवारी रोजी पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री १०:०० ते १२:०० वाजेपर्यंत वर नमूद गोष्टीसाठी परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी यांचे आदेशाच्या अधीन राहून रात्री १२:०० वाजेनंतर कोणताही कार्यक्रम होणार नाही अशी सूचना महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी देखील जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Similar Posts