‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक संपन्न..

औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर 54, गंगापूर 35, खुलताबाद 11, सिल्लोड 30, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्राम संजिवनी समितीच्या समन्वयाने जल व मृद संधारणातील कामांबाबतचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जल व मृद संधारण कामांमध्ये सिमेंट नालाबांध, कंपोजिट गॅबीयन, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, अनघड दगडी बांध, समतल चर, माती नाला बांध आदी कामांचा समावेश असल्याचे डॉ. मोटे यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी माहिती दिली.

पोकरा योजनेंतर्गत सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबादच्या उपविभागनिहाय लाभांबाबतची सद्यस्थितीची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक, तालुकानिहाय वितरीत अनुदान, कृषी विकास घटकाचा प्रगती अहवाल, सुक्ष्म नियोजन प्रक्रिया आदींचाही समावेश होता.

समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये (पोकरा) एक हजार 175 नवीन गावांचा समावेश झाल्याची यादी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या यादीच्या सत्यतेबाबत कृषी विभागाकडे सतत विचारणा होत आहे. सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. पोकरामध्ये नव्याने कोणत्याही गावांची निवड झालेली नाही. जिल्ह्यात पूर्वी निवडलेल्या 406 गावांमध्ये कोणतीही भर पडली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!