कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील राज क्लॉथ स्टोअर सील..
औरंगाबाद: शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोना लसीकरण शंभर टक्के व कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.
त्यासाठी औरंगाबाद शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, नागरिक कोरोना नियमांचे व्यवस्थित पालन करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी नऊ भरारी पथक नियुक्त केले आहेत.
या भरारी पथकामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक कामगार उपायुक्त वाय. एस. पडीयाल, मनपा झोन क्रं. 9 चे अधिकारी संपतराव दराडे व पोलीस अधिकारी, कर्मचारी व मित्र पथकाने दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान आकाशवाणी येथील राज क्लॉथ या कापडाच्या दालनाला अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याने मास्क लावले नव्हते, तर एका कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिलाच डोस घेतलेला होता. यावरून या दालनाला सिल करून याविषयी पुढील कार्यवाईची माहिती जिल्हाधिकारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
टाऊन सेंटरच्या ‘भोज’ ला सुनावणीत 15 हजारांचा दंड
यापूर्वी देखील टाऊन सेंटर येथील शाही भोज येथे सुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती, नियमांचे उल्लंघन केल्याबाबत शाही भोजला 15 हजारांचा दंड आकारण्यात आला होता.
शाही भोज मध्ये अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत 6 जानेवारी रोजी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्याने, आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक आढळल्याने आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.