महाराष्ट्रासाठी सांडले आहे अनेकांनी रक्त.., जाणून घ्या ‘महाराष्ट्र दिना’चा थरारक इतिहास..!

आज आहे १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. मराठी माणसाचे हक्काचे राज्य निर्माण झाले तो दिवस. पण हे मराठी राज्य इतक्या सहज तयार झाले नाही, तर त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलीय, अनेकांना रक्त सांडावं लागलंय. त्यानंतर मराठी माणसांचा हा ‘महाराष्ट्र’ तयार झाला आहे. मग हा दिवस विसरुन कसं चालेल..?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताची सुटका झाली. त्यावेळेस मात्र भारताचा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. संस्थान, राजे-महाराजे नावापुरते काही होईना अस्तित्वात होते. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा अस्तित्वात आला नि हळूहळू भाषा नि प्रदेशांच्या आधारे राज्यांची निर्मिती व्हायला लागली.

काय आहे महाराष्ट्राचा इतिहास?

अन्य राज्ये तयार होत असताना मराठी माणसाला महाराष्ट्रा राज्यासाठी खूप वाट पाहावी लागली. सुरुवातीला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा घाट घातला जात होता. मुंबई प्रांतामध्ये गुजराती व मराठी भाषिक लोक राहत असे. त्यामुळे मुंबई हे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरीत होती. गुजराती लोकांना स्वतःचं वेगळे राज्य पाहिजे होतं, तर मराठी लोक स्वत:साठी वेगळं राज्य मागत होते. मुंबईसह महाराष्ट्रात आणण्यासाठी देशात अनेक आंदोलने झाली.

मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरामध्ये २१ नोव्हेंबर १९५६ रोजी तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारले. मराठी माणसे चिडली. सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात कामगारांचा एक विशाल मोर्चा आला.

तत्कालिन सरकारने खाकीच्या बळाचा वापर करुन हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज सुरु केला. मात्र, तरीही आंदोलक ठामपणे उभे होते. अखेर पोलिसांनी जमावावर गोळीबार सुरू केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये १०७ आंदोलक हुतात्मे झाले.

या घटनेनंतर जनतेमध्ये राग उफाळून आला. व संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. हुतात्म्यांचे बलिदान अन् मराठी माणसाच्या आंदोलनामुळे शेवटी सरकारला झुकते घ्यावे लागले अन् मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदेमध्ये २५ एप्रिल रोजी ‘बॉम्बे पुनर्रचना कायदा-१९६०’ लागू करण्यात आला.

अखेर महाराष्ट्र अस्तित्वात आला..

१ मे १९६० रोजी बॉम्बे पुनर्रचना हा कायदा अंमलात आला. गुजरात अन् महाराष्ट्र राज्यांचा जन्म झाला. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मंगल कलश’ देऊन नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.

१ मे हा दिवस मराठी माणसासाठी खास आहे. या दिवशी महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे विविध कार्यक्रम, पारंपरिक मिरवणुका काढल्या जातात. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र, यावेळेस निर्बंधमुक्त नसल्यानं महाराष्ट्र दिन जोरात साजरा होणार, हे नक्की..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!