वयानुसार आहारात करावे ‘हे’ बदल; कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त? जाणून घ्या..
वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक आहाराचा समावेश असणं गरजेचं असतं. तुमच्या वयानुसार ठरवा परफेक्ट डाएट प्लॅन
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीर थकत जाते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते. वयोमाना नुसार आहारामध्ये बदल केला तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहू शकते. वया-नुसार शरीराच्या गरजा, शरीराला आवश्यक असलेले पोषण हे वेग-वेगळे असते. वयाच्या 20व्या वर्षी आपण खात असलेले पदार्थ आपण वयाच्या 60व्या वर्षी खाऊ शकूच असे नाही. त्यामुळे वया नुसार आपल्या आहारात बदल करने आवश्यक असते. कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले ठरतील जाणून घ्या.
वय 20 वर्षे
या वयात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती खूप चांगली असते. त्यामुळे या वयामध्ये आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्या तर तरुण शरीर त्यातून बरे होण्याची शक्यता जास्तच असते. या वयामध्ये हाडे आणि मांस-पेशी वेगाने तयार होत असल्यामुळे या वयातील आहार खूपच महत्त्वाचा असतो. या वयामध्ये आपले शरीर अॅक्टीव्ह असल्याने शरीराला प्रथिने, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट यांची गरज असते. त्यामुळे सुकामेवा, दाणे, फळे, दूध, दही, पाले-भाज्या, ताक यांचा आहारात समावेश करावा.
वय 30 वर्षे
या वयामध्ये नोकरी, लग्न, करिअर अशा अनेक जबाबदाऱ्या आलेल्या असतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिक अनेक बदल होत असतात. या वयात आपण आपले जीवन स्थिर-स्थावर होण्याकरीता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो. या वयात आपले प्राधान्यक्रम बदललेले असल्यामुळे आपल्यावर खूप जास्त ताण असतो. या वयात शरीराच्या पोषण करीता आवश्यक असणारे पदार्थ जसे की, पालेभाज्या, फळे, अंडे, शहाळे, ऑलिव्ह ऑईल, कमी स्निग्धता असलेले दुग्धजन्य पदार्थ खायला हवे.
वय 40 वर्षे
या वयात आपण आपल्या जीवनाचा अर्धा टप्पा गाठलेला असतो. जीवनातील बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. वयाच्या 40व्या वर्षी आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होण्यास सुरु होते. रक्तदाब, मधुमेह, मेटाबॉलिझम, लोहाची कमतरता, हाडांचे दुखणे अशा तक्रारी कमी-जास्त प्रमाणात सुरु झालेल्या असतात. या वयात व्यक्तीची पाचन क्षमता काही प्रमाणात बिघडलेली असते. तसेच वजन नियंत्रणामध्ये ठेवणे हे एक आव्हान झालेले असते. त्यामुळे या वयात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर सगळ्या भाज्या खाव्यात. शिवाय आहारामध्ये लसूण, कांदा, हळद, ऑलिव्ह ऑईल असे हृदयाला मजबूत बनवणारे पदार्थ खायला हवे. ओमेगा-3 या वयात अतिशय उपयुक्त ठरते.
वय 50 वर्षे
इतकी वर्षे धाव-पळ केल्यावर या वयात शरीर बोलायला लागलेले असते. या वयात हाडे आपले अस्तित्त्व दाखवायला सुरुवात करतात. तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्यावर जळ-जळायला लागते. केस पांढरे होतात. दात दुखतात, त्यामुळे या वयात आहाराकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या वयामध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, व्हीटॅमिन-बी, अंडी, कडधान्ये जास्त प्रमाणात खायला हवे. तसेच बाहेरचे खाणे टाळलेलेच उत्तम.
वय 60 वर्षे
भारतात नोकरीमधून सेवानिवृत्त होण्याची वयोमर्यादा साधारण 60 वर्षांची आहे. कारण 60 वर्षी वयानंतर शरीराची क्षमता कमी होते. पचन-क्षमतेवरही परिणाम होतो. वयाच्या या टप्प्यामध्ये शरीराला मायक्रो न्यूट्रिएंट्स अर्थात सूक्ष्म अन्न-द्रव्यांची कमतरता भासू लागते. प्रथिनांच्या कमतरते-मुळे स्नायू दुखू लागतात, हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, प्रथिनं आदींचा आहारात समावेश असणे वयाच्या या टप्प्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. हे लक्षात घेऊनच सूप, डाळी, कडधान्यं, भाजीपाला आदींचा आहारात समावेश करणे आवश्यक ठरते.