औरंगाबादच्या शिल्पकाराने साकारली संसदेच्या नवीन इमारतीवर असलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती…
New Parliament Building : नवीन संसद भवनच्या इमारतीचे बांधकाम येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार असलं तरी सुद्धा चार दिवसांपूर्वीचं (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनच्या नवीन इमारतीवर साकारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
हे अशोक स्तंभ कांस्य या धातूपासून बनवलेले असून याचे वजन 9,500 किलो आणि उंची 6.5 मीटर एवढी आहे. या अशोक स्तंभाची प्रतिकृती औरंगाबाद शहराजवळच्या खुलताबाद येथील शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे यांच्या देवरे अँड असोसिएशनने टाटा प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. तर धनश्री काळे यांनी या स्तंभाला डिझाइन केले आहे.
टाटा ग्रुप तर्फे अशोक स्तंभ या राजमुद्रा शिल्पाचे काम देवरे अँड असोसिएट यांना मिळाले. याकरीता प्रथम माती आणि थर्माकोलची (Thermocol) प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यानंतर ‘क्ले मॉडेल’ तयार करण्यात आले. संसद भवनच्या पथकाने देवरे यांच्या स्टुडिओमध्ये भेट देऊन ‘क्ले मॉडेल’ची पाहणी करून त्यामध्ये अपेक्षित बदल सुचवत या मॉडेलला मंजुरी दिली. त्यानंतर फायबरचे शिल्प तयार करून त्या शिल्पाचे लहान लहान भाग तयार करून जयपूर येथील शिल्पित स्टुडिओमध्ये या शिल्पाचे ब्राँझमधील एकसंघ शिल्प साकारण्यात आले.
या भव्य अशोक स्तंभाची प्रतिकृती साकारून सुनील देवरे व सुशील देवरे यांनी फक्त एक वास्तूच नाही तर इतिहास घडवून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे देशातील सर्वच स्तरातून सुनिल आणि सुशिलचे मोठे कौतुक होत आहे. देशातील एवढ्या महत्वाच्या वास्तूची प्रकृती साकारण्याची संधी महाराष्ट्राच्या पुत्राला मिळाली ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.