गुजरात येथील नशेच्या ‘बटण गोळ्या’ औरंगाबादमध्ये; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा..
औरंगाबाद शहरामध्ये मागील काही दिवसांपासून नशेच्या ‘बटण गोळ्यांची विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकाची स्थपना करून कारवाईचा बडगा उचलला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत या बटण गोळ्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, सुरत येथील मेडिकलमधून या गोळ्यांची खरेदीकरून औरंगाबाद शहरामध्ये एजंट मार्फत विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. डी. पी. एस. सेलचे पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी प्रतिक उर्फ पत्या मधुकर गोरे ( 24 वर्षे रा. जाधववाडी) नावाचा व्यक्ती गुंगी आणणाऱ्या नशेच्या गोळया विक्री करत आहे. गोपनिय माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचून एन-8 येथील जॉगिंग ट्रैक समोरून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून 505 नशेच्या बटण गोळया व मोबाईल फोन असा एकूण 23, हजार 104 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आपण त्या बटण गोळ्या आरीफ खॉन बशीर खान (40 वर्ष रा. मालेगाव ह. मु. सावंगी ) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले..
प्रतिक उर्फ पत्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरीफ खानचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने, 8-10 दिवसापूर्वी सिडको पोलीस ठाण्यात अटक असलेला इब्राहीम शहा अकबर शहा (बापू नगर सुरत) याच्याकडून या नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी घेतल्याची माहिती दिली. शिवाय विकत घेतलेल्या गोळ्याचे काही बॉक्स कटकटगेट येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला आणि प्रतिक उर्फ पत्या मधुकर गोरे याला विक्री केल्याची कबुली दिली. त्यामुळे याप्रकरणी प्रतिक आणि आरीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बटण गोळ्यांचे गुजरात कनेक्शन उघड..
8 दिवसापूर्वी सिडको पोलीस ठाणे हद्दीतील इब्राहीम शहा अकबर शहा याला पोलिसांनी नशेच्या बटण गोळ्या विक्री प्रकरणी अटक केली होती. सद्या तो कारागृहात असून तो या गोळ्या सुरतमधील मेडिकलमधून खरेदी करून गोळ्या औरंगाबादेत आणून विक्री करायचा.