शेतातून परतणाऱ्या चुलती-पुतणीला टेम्पोने चिरडले; चुलती-पुतणीच्या मृत्यूने गावात हळहळ..
दिवसभर शेतात काम करून घरी परतत असताना दोन महिलांना भरधाव जाणाऱ्या टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातामध्ये ठार झालेल्या दोन्ही महिला नात्यात चुलती-पुतणी होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही घटना असून, ठगनबाई विश्वनाथ दवंगे वय ५६ वर्ष आणि मंगल आसाराम दवंगे वय ३८ वर्षे, दोघी रा. मनूर ता. वैजापूर असे मृत महिलांचे नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, ठगनबाई विश्वनाथ दवंगे आणि मंगल आसाराम दवंगे या दोघी शेतातून मजुरी करून घराकडे पायी येत असताना साकेगावहून मनूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो क्र. MH 21 D 9116 त्या दोघींच्या अंगावरून गेल्याने दोघीही चिरडल्या जाऊन जागीच ठार झाल्या. अपघातस्थळी रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. अपघातानंतर चालकाने टेम्पो जागेवर सोडून पोबारा केला.
मृत ठगणबाई दवंगे यांच्या पतीचे पूर्वीच निधन झालेले असून त्यांना दोन अविवाहित मुले आहेत. अत्यंत बेताची परिस्थिती असल्याने मोलमजुरी करून मुलांचे पालनपोषण करीत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे वडिलांनंतर आईचेही छत्र हरविल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहे. तर दुसरी मयत महिला मंगलबाई दवंगे यांना त्यांचा पती नांदवत नसल्यामुळे त्या माहेरी राहून मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवत होत्या.


