तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना.
औरंगाबाद मधील शताब्दी नगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही तरुणांनी चोरीच्या संशयावरून एका तरुणाला केलेल्या मारहाणी मध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेतील मेघवाले हॉल येथे वॉचमन म्हणून कामाला असलेल्या मनोज आव्हाडला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून सात- आठ जणांनी हातपाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद नगर येथे असलेल्या मेघवाले सभागृहामध्ये मयत मनोज आव्हाड हा वॉचमन म्हणून काम करत होता. मनोज हा पत्नी आणि मुलांसह सभागृहाच्या एका खोलीमध्ये राहत असायचा. या सभागृहाचे कामकाज माजी नगरसेवक गणपत खरात यांचे चिरंजीव सागर खरात हा पाहतो. आणि येथेच सतीश खरे हा मंडपचे काम पाहतो. काही दिवसांपूर्वी मयत मनोजची पत्नी माहेरी गेली होती. यातच मनोजला कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे बुधवारी तो चंपाचौक येथे आईकडे गेला होता.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास सतीश खरे -८ मुलांसोबत चंपा-चौक येथील घरून मनोजला मंडपाचे काम करण्यासाठी घेऊन गेला. नंतर मनोजला मेघवाले सभागृह येथे आणत फोकस लाईट्सच्या चोरीचा जाब विचारण्यात आला. मात्र यावेळी वाद वाढल्याने सतीश खरे, सागर खरात, आनंद सोळस, आनंद गायकवाड, अष्टपाल गवई, सागर खरातचा भाऊ आणि इतर तिघांनी मनोजचे हातपाय बांधून लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण केली. यात मारहाणीत मनोज गंभीर जखमी झाला होता. संध्याकाळी गंभीर जखमी मनोजला घाटी रुग्णालयात दाखल करून मारहाण करणारा अष्टपाल हा तेथून पसार झाला. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले
मोठ्या भावाला पाठवला मारहाणीचा व्हिडीओ.
मारहाण करणाऱ्यांपैकीच एकाजणाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. व्हिडीओ पाहताच मनोजच्या भावाने औरंगाबाद येथील सतीश खरेचे घर गाठले. मात्र तो घरी नव्हता, नंतर ते मेघवाले ,सभागृहात आले असता तेथेही कुलूप होते. दरम्यान, मनोजला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घाटी रुग्णालय गाठतासच आव्हाड कुटुंबियांना मनोज मृत झाल्याचे समजले.
गुन्हा दाखल, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात –
मयत मनोजच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सतिष खरे, आनंद सोकळस, आनंद गायकवाड, सागर खरात, अष्टपाल गवई यांच्यासह आठ जणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.