इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यास केंद्र सरकारकडून बंदी; आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय..
अलीकडच्या काळात, देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे, सरकारने इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्यांना सध्या नवीन दुचाकी लॉन्च करणे टाळण्यास सांगितले आहे. जोपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांचा तपास होत नाही आणि योग्य कारणे कळत नाहीत, तोपर्यंत नवीन इलेक्ट्रिक दुचाकी सुरू करू नयेत, असे सरकारचे मत आहे.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या बैठकीनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मात्यांना हा संदेश देण्यात आला. देशभरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर अशी बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत सामील असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांना सध्या नवीन इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करू नये असे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत इलेक्ट्रिक टू व्हीलरमधील आगीच्या घटनांचे कारण कळत नाही आणि जोपर्यंत ते नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत नवीन वाहन टाळावे.”
देशातील इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना आग लागलेल्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बॅचमधील सर्व इलेक्ट्रिक टू व्हीलर परत मागवण्यास सांगण्यात आले आहे. ईव्ही कंपन्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारताच्या परिवहन मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपन्यांनी अपघात झालेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या बॅचची चौकशी करून परत बोलावले पाहिजे. गडकरींच्या निर्देशानंतर ओला, ओकिनावा आणि प्युअर ईव्ही सारख्या कंपन्यांनी 7000 हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी परत मागवून तपास सुरू केला आहे.