✨आकाशात अग्निवर्षा..! तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.

साधारणत: रात्री ८ ची वेळ. नागपुरमध्ये काही नागरिक घराबाहेर फिरत हाेते तर काही गच्चीवर गप्पा मारत बसले हाेते. आणि अचानक आवकाशातून अग्निवर्षा हाेताना दिसली. काहींच्या मनात कुतूहल निर्माण झाले तर काहींच्या मनात भीती की नेमके हा उल्कावर्षाव आहे की दुसरेच काही?

ऐन गुढीपाडव्याच्या रात्री उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात उल्कावर्षाव सदृश्य घटना पहायला मिळाली. उल्कापाताचे हे दृष्य अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. व ते व्हिडिओ सोशल मिडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल केले आहेत. काहींच्या मते लोखंडी रिंग आकाशातून पडली तर काहींच्या मते उल्का कोसळली आहे.

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:११ वाजता न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटव्दारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.

आज केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज संध्याकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत अशी माहिती औरंगाबाद येथील MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. ते म्हणाले की, साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चीत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग

शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आवकाशातून गतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचे खूप लोकांना दिसले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यामधील लाडबोरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री ७.४५ वाजता एका विशेष धातूची तप्त मोठी रिंग कोसळली.

गावातील लोकांना ती लाल तप्त रिंग आकाशातून गावाच्या दिशेने येत असल्याची दिसले आणि क्षणातच ती रिंग जमिनीवर कोसळली. जोराचा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी रिंग पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्यानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री ८.१५ वाजता घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा पोहोचला व त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले. एखादे जुने सॅटेलाइट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळले असावे, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपने यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या वस्तू आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे गोंडपिपरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातही अनेकांना दिसले.

Similar Posts