माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू…

श्रीनगर: नववर्षाच्या सुरूवातीलाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा टेकडीवरील माता वैष्णोदेवी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १२ लोक मरण पावले असून त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी कटरा बेस कॅम्पमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून बहुतेकांवर माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तसेच मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. श्राइन बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी घटनास्थळी असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान वैष्णोदेवी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

मृतांमध्ये दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. इतरांची ओळख पटवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे.

प्राथामिक माहितीनुसार नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. शनिवारी पहाटे साधारण २ वाजेच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून केले शोक व्यक्त

माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अत्यंत दु:ख झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना केले आहे तसेच जखमी लवकर बरे होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. तसेच सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!