किल्ले अंतुरची तटबंदी ढासळत आहे तरी पुरातत्व विभागाची चुप्पी का ?

कन्नड तालुक्यातील किल्ले अंतुरची तटबंदी काही दिवसांपूर्वी ढासाळली.या मुळे दुर्गप्रेमी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.सततच्या चालू असलेल्या पावसामुळे सदरील कामाचे पितळ उघडे पडले आहे.

किल्ले अंतुर हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. हा ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत चालला आहे.तरी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नाही. २०१६-१७ साली या किल्ल्याच्या काम साठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून हे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते.पण संबंधित कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, त्यामुळे ही तटबंदी दरवर्षी ढासळत आहे. जर अश्या प्रकारे तटबंदी ढासळत आहे तर मग ४ कोटी रुपये गेले कुठे ??? यावर पुरातत्व विभागाची चुप्पी का? असा प्रश्न तालुक्यातील दुर्गसेवक, दुर्गप्रेमी करत आहे.

या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

मलिक अंबर ने बांधलेल्या तलावालगतच्या भिंतीची एक वेळेस दुरुस्ती करूनही भिंत दुसऱ्या वेळेस कोसळली आहे.किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीही ढासळत आहे. किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता २ वर्षा पासून खचला आहे, सदरील एकमेव रस्ता हा किल्ल्याकडे जाणारा असल्यामुळे तेथून दुर्गप्रेमींना जाण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे, यावरून कोटी रुपये खर्च करून केलेल्या कामाचा दर्जा दिसुन येत आहे. सदर कंत्राटदार यांच्यावर योग्य कारवाई करावी,अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानचे मराठवाडा प्रशासक डॉ.पवन गिरी, व सह्याद्री प्रतिष्ठान संभाजीनगर चे पदाधिकारी महेश भिंगारे, जगदिश कंचार, शिवराज पाटील यांनी केली आहे.

पुरातत्व विभागाने याची दखल घेऊन याकडे लक्ष घालावे व लवकरात लवकर बोगस कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. या कामाची लवकर चौकशी झाली नाही तर कन्नड तालुक्यातील दुर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान कन्नडचे तालुका अध्यक्ष शिवराज पाटील यांनी दिला आहे.

Similar Posts