मुलाला कामावरुन काढल्याचा राग येऊन बापाने मित्रांसह रुग्णालयाची केली तोडफोड.. घटना CCTV मध्ये कैद..
औरंगाबाद मधील बजाजनगर येथील एका खाजगी रुग्णालयाची तोडफोड आणि दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालया बाहेर लावलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद मधील बजाज नगर मध्ये खाजगी रुग्णालयामध्ये कामावर असलेल्या आपल्या मुलाला कामावरुन काढले. त्यामुळं मुलाच्या वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मित्रांसोबत त्या रुग्णालयात तोडफोड करून दगडफेक केली आहे.
यावेळी रुग्णालयाच्या सामानाची नासधूस केली. CCTVत हे टोळके खुर्च्या, टेबल फेकून देताना दिसत आहे. सुदैवानं या तोडफोडीत कुणालाही इजा झाली नाही. मात्र रुग्णालयातील सामानाचे खूप नुकसान झाले आहे.
या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.