शेत रस्त्यासाठी कसा करालं अर्ज ? जाणून घ्या अगदी तुमच्या भाषेत..
How to apply for farm road : जसजशी जमिनीची विभागणी होत आहे, तसंतशी शेत रस्त्यांची मागणी वाढत चाललेली आहे, आज आपण शेताच्या नवीन रस्त्यासाठी अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची काय प्रक्रिया असते याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कसा करावा अर्ज? How to apply for farm road
जर शेतकऱ्याला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये स्वतच्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याकरीता अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.
मात्र, यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे तसा एक लेखी अर्ज करावा लागतो. परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी लिहिलेल्या ‘महसूल कामकाज पुस्तिका’ या पुस्तकामध्ये तुम्ही शेतरस्त्याच्या अर्जाचा नमुना बघू शकता. हे पुस्तक www.drdcsanjayk.info या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा ते जाणून घ्या…
प्रति,
मा तहसिलदार साहेब,
सिल्लोड ( संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या तालुक्याचे नाव लिहावे)
अर्ज – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.
विषय – शेतात ये-जा करण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळण्याबाबत.
येथे अर्ज करणाऱ्याचा जमिनीचा तपशील लिहावा-
नाव – किशोर जैस्वाल, गाव – उंडणगाव, ता. सिल्लोड जिल्हा – औरंगाबाद
शेती गट क्रमांक – 26, क्षेत्र – 1.89 हे. आर., आकारणी – — (येथे कराची रक्कम टाकावी)
येथे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता लिहावा –
आता इथे अर्जदाराच्या शेतीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्याही शेतकऱ्याची जमीन आहे त्यांची नावे आणि पत्ता लिहणे आवश्यक आहे.
त्यानंतर अर्जाच्या मायनामध्ये तुम्ही समोरील तपशील लिहू शकता…
मी किशोर जैस्वाल (संबंधित शेतकऱ्याचे नाव) गाव- उंडणगाव येथील कायम रहिवासी असून काजीपुर येथील गट क्रमांक 26 मध्ये माझ्या मालकीची 1.89 हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरील शेतामध्ये ये-जा करण्यासाठी गाव-नकाशावर रस्ताच नाही. त्यामुळे शेतामध्ये बैलगाडी अथवा ट्रॅक्टरमधून शेती अवजारे, बी-बियाणं आणि रासायनिक खतांची वाहतूक करतांना अडचण निर्माण होते. तसेच शेतामधील झालेला माल घरी आणण्यासाठी खूप त्रास होत आहे.
तरी मौजे काजीपुर ता. सिल्लोड येथील गट क्रमांक 26 मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीतून बैलगाडी अथवा ट्रॅक्टर शेतात वाहतूक करणे सोपे होईल, त्यामुळे मला असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करून द्यावा, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
किशोर जैस्वाल
इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की, एक उदाहरण म्हणून मी माझ्या नावाचा अर्ज करून दाखवला आहे. या अर्जामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी आपापली स्वत:ची माहिती भरणे आवश्यक आहे.
हा अर्ज भरला की या अर्जाबरोबरचे पुढील कागदपत्रे जोडावी.
- अर्जदाराची जमिन आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेतजमिनीचा कच्चा नकाशा
- अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांमधला तीन महिन्याच्या आतील ७/१२.
- आजूबाजूच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या शेतजमिनीचा तपशील,
- अर्जदाराच्या शेतजमिनीचा न्यायालयामध्ये काही वाद- विवाद सुरू असेल तर कागदपत्रांसहित माहिती.
एक वेळेस का शेतकऱ्याने अर्ज दाखल केला कि, अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केलेली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. तसेच अर्जदाराला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची गरज आहे काय, याची प्रत्यक्ष पाहणी तहसीलदारांकडून करून खातरजमा करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देऊन आदेश पारित करतात.
त्या आदेशामध्ये एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा अर्ज फेटाळतात. तहसीलदारांनी अर्ज मान्य केल्यास लगतच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित करण्यात येतो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत-कमी नुकसान होईल याच्याकडे लक्ष ठेवण्यात येतो. सर्व सामान्यपणे अर्जदार शेतकऱ्याला 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर करण्यात येतो, म्हणजे एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता देण्यात येतो.
परंतु, अर्जदार शेतकऱ्याला तहसीलदारांचा आदेश मान्य नसल्यास आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून दोन महिने म्हणजेच 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील करता येते किंवा एका वर्षाच्या आतमध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. How to apply for farm road