नोटांवरून बदलणार महात्मा गांधींचे चित्र?
मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एका गोष्टीची चर्चा सुरु होती, आणि ती म्हणजे, भारतीय चलन असलेल्या नोटांवर लवकरच डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो पाहायला मिळतील, त्यामुळे नोटांवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो काढला जाणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.
RBI (आरबीआय), सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SPMCIL (एसपीएमसीआयएल) यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि ए.पी.जे. कलाम यांचे दोन वेगवेगळे वॉटरमार्क सेट ‘आयआयटी, दिल्ली’ला पाठवलेले आहेत. प्रा. दिलीप टी. साहनी यांना त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे.
त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकार-समोर ठेवला जाणार असून, त्यावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. 2020 मध्येच RBI (‘आरबीआय’) अंतर्गत कार्यरत समितीने महात्मा गांधी यांच्याशिवाय रवींद्रनाथ टागोर व ए.पी.जे. कलाम यांच्या फोटाेच्या नोटा छापण्याची शिफारस केली होती, असे वृत्त व्हायरल होत होते.
‘RBI ने केला खुलासा
भारतीय रिझर्व्ह बॅंक अर्थात RBI (आरबीआय) ने एक निवदेन जाहीर करुन या वृत्ताचे खंडन केलं. या निवेदनात असं म्हटलंय, की ‘प्रसार माध्यमांमधून असं वृत्त दिले जातंय, की RBI (आरबीआय) सध्याच्या नोटांवरील महात्मा गांधी यांचे फोटो बदलून अन्य महापुरुषांच्या फोटोसह नोटा छापण्याची तयारी करीत आहे. प्रसार माध्यमांमधून प्रसारित होत असलेली ही माहिती चुकीची असून, असा कोणताही प्रस्ताव ‘आरबीआय’समोर नसल्याचे या केंद्रीय बॅंकेने स्पष्ट केलंय.