इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत? ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन वाद..

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी जळगावमध्ये किर्तना दरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलंय. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा-निमित्त आयोजित केलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांनी कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेऊन पास झालेल्या मुलांना नोकरीच मिळणार नाही, असे वक्तव्य केलंय. तसेच पगार देताना बुद्धी तपासली पाहिजेत असं सुद्धा इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय. त्यामुळे आता या व्यक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले.

“मागील ३ वर्षात तुम्ही तुमच्या मुलाला पसायदान शिकवू शकले नाहीत यामुळे मग १६ वर्षांचा मुलगा बलात्कार करतो, १७ वर्षांचा मुलगा हत्या करतो त्याचं कारण काय? १८ वर्षांची पोरं रात्री पोलिसांनी एकत्र पकडली तर त्यांच्या गाडीत काय सापडतं? त्यांच्या गाडीत सापडतो तो गावठी कट्टा, नायलॉनची दोरी, मिर्चीचे पावडर. का १६ वर्षांचा मुलगा का बलात्कार करतो? का १७ चा मुलगा का हत्या करतो?,” असे प्रश्न महाराजांनी किर्तना दरम्यान उपस्थित केले.

किर्तनाकरीता मंचावर वादकांच्या ओळीमध्ये उभ्या असलेल्या लहान मुलांकडे बोट करुन म्हणाले, “ही जी पोरं उभी आहेत ना, ती गायक नाही झाली, किर्तनकार नाही झाली तर चोर तर नक्की होणार नाहीत. महाराष्ट्रातील पोलीस खाते जागेवर आहे म्हणून जनता ठिकाणावर आहे.”

“संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या सगळ्यात मोठ्या संकटावर तिघांनी नियंत्रण मिळवलं. एक म्हणजे डॉक्टर, दुसरे म्हणजे पोलीस आणि तिसऱ्या म्हणजे सामाजिक संस्था. त्यात डॉक्टरांनी जरी केलं तरी त्यात त्यांनी थोडा टाका-टूका काढला. त्यांचं एवढं कौतुक कारायचं नाही, पण ज्यांनी स्वत:चा बळी दिला त्या पोलीस खात्याचं नक्की कौतुक करा. कोरोना योद्ध्याचा सत्कार करायचा असल्यास सगळ्यात पहिले पोलिसाचाच सत्कार करावा. का तर स्वत:चा संसार वाऱ्यावर सोडून त्याला डांबरीवर ड्युटीवर जायचंय. मुलगी म्हणाली की मला शिकवणीला सोडा. पोलीस कर्मचारी म्हणाले नाही गं मला कामावर जायचंय. ती बिचारी रिक्षाने गेली पण तो मात्र ड्युटीशी प्रामाणिक होऊन अगदी वेळेत पोहचत असतो.

आपल्याकडे मात्र उटले नियम आहेत, खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे. त्यांना पगार कमी. ज्यांना काहीच काम नाही, त्यांना पैसाच मोजता येत नाही (म्हणजे एवढा पगार आहे.) सर्व्हिसवाल्यांचे (सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे) पगार हे बुद्धीवर आधारित असले पाहिजे,” असं निवृत्ती महाराज म्हणाले. “एक जानेवारीला मेंदू तपासायचा. जितकी बुद्धी कमी असेल तेवढा पगार कमी करायचा. हा विनोद नाही,” असंही निवृत्ती महाराज पुढे बोलताना म्हणाले.

सर्व वारकरी जर एकत्र आले तर देश बदलू शकतात असंही निवृत्ती महाराजांनी म्हटलं. विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तर पुढची पिढी घडेल, असं वक्तव्यही त्यांनी किर्तनादरम्यान केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!