उंडणगाव येथील बालाजी उत्सवास प्रारंभ..

उंडणगाव ता. सिल्लोड येथील ३५० वर्षाची परंपरा असलेला बालाजीचा उत्सव आज दिनांक २४ मे मंगळवारपासून सुरुवात झाली असून या उत्सवाची सांगता लळीताने दिनांक ९ जून रोजी होणार आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष हा बालाजी उत्सव बंद ठेवण्यात आला होता. आज मंगळवारी रात्री श्री बालाजी भगवंताची मूर्ती सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन नगर प्रदिक्षणा करण्यात येणार आहे. वर्षभर मंदिराच्या गाभार्‍यात विराजमान असलेले श्री बालाजी भगवंत वर्षातून एकदा गावातील प्रत्येकाच्या घरासमोरून जात असल्याने, भगवंताच्या मूर्तीला औक्षण तरुण कानगी देतात व भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करतात. साक्षात भगवंत आपल्या दारी येणार म्हणून गावातील प्रत्येक महिला आपल्या दारासमोर सडा-रांगोळी काढून भगवंताचे स्वागत करतात.

गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या वाड्यात श्री बालाजीचे मंदिर असून त्यास देवळा असे म्हटले जाते. उत्सवाच्या काळामध्ये अन्नदानाची जुनी परंपरा आजही चालू आहे. उत्सवाच्या काळामध्ये मागील दोन वर्षात अन्नदानाचे कार्यक्रम झाले नसल्यामुळे यावर्षी १७ दिवस गाव भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार असून, ८५ अन्नदाते हे अन्नदानाचे कार्य करणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त मंडळांनी सांगितले.

साडेतीनशे वर्षापूर्वी निजाम काळात गावातील नागरिकांनी मिळून गिरी बालाजी येथून श्री बालाजी ची मूर्तीची स्थापना होती तेव्हापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पहिल्या दिवशी मंदिराच्या परिसरामध्ये झेंडा उभारून रात्री बालाजी महाराजांची पालखी ची मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत भजनी मंडळी मंगल वाद्य वाजवत विविध सांस्कृतिक भारुड करतात. परंपरेने चालत आलेली ही परंपरा प्रत्येकाच्या घरासमोर पालखी थांबवण्यात येते. घरात नवीनच लग्न झालेले नवविवाहित जोडपे जोडीने श्रीचे पूजन करतात, व कानगी भरलेल्या उपाध्य हे मुली-मुलाच्या हातात नारळ घेऊन नवरीची ओटी नारळाने टाकण्यास सांगतात.

उत्सवाच्या काळामध्ये मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम रोज रात्री घेण्यात येतात. त्याच बरोबर दिनांक २ जून २०२२ गुरुवार रोजी शेतकऱ्यांना हवामान तज्ञ पंजाब डख यांचा मार्गदर्शन व सल्ला कार्यक्रम कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, तरी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे ही विश्वस्त मंडळाने सांगितले आहे.

उत्सव काळामध्ये पाळल्या जातात या प्रथा.

बालाजी उत्सव काळामध्ये गावकरी मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने विविध प्रथांचे पालन करत असतात. उत्सवाच्या काळामध्ये लग्न समारंभ करणे, दाढी-कटिंग करणे, नवीन वस्त्र, वस्तू घेणे किंवा परिधान करणे टाळले जाते. त्याचबरोबर पापड, लोणचे बनवणे, वाळवण घालणे, याशिवाय मंगल वाद्य वाजवणे, कोणतेही मंगल कार्य करणे, आपल्या घरामध्ये तेलाची फोडणी सुद्धा देने वर्ज्य मानले जाते. कामानिमित्त बाहेरगावी असलेले गावातील नागरिक या उत्सव काळामध्ये बालाजीच्या दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात.

Similar Posts