केकेचं अकाली जाणे आणि आपले जगणे..

लोकप्रिय हिंदी गायक केके याचं काल वयाच्या ५३ व्या वर्षी ह्दयाघाताने निधन झालं. ते कोलकात्याला एका कार्यक्रमांत असतांनाच त्यांची तब्येत खालावली. तरीही त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला. मात्र हॉटेलवर परतल्यावर त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झालं. ५३ वर्षे हे काही जाण्याचं वय नाही. अपघात समजू शकतो पण शारिरीक आजारामुळे आणि अशा पद्धतीने जाणे हे निश्चितच दुःखद आहे.

कलाकार हे त्यांचे आयुष्य अत्यंत व्यस्त जगत असतात आणि त्यात त्यांना आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी सुद्धा घेता येत नाही. किंबहुना अनेकदा ते त्याकडे दूर्लक्ष करतात. बऱ्याच वेळेस आपल्याला काही होणार नाही हा अनाठायी विश्वास आपल्यासह अनेकांना असतो. आणि मग मृत्यु त्यांना अवचित गाठतो. ही शोकांतिका आहे, पण यातून आपण सर्वांनीच काही धडा घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

आयुष्य जगणे म्हणजे काही शर्यत नाही. आणि असली तरीही त्यामध्ये प्रत्येकाला जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी अति घाई करण्याची गरज नाही. कदाचित अति घाई करून तुम्ही जिंकालही, पण त्या जिंकण्याचा आनंदही तुम्हाला साजराच करता येणार नाही. आपल्या तब्येतीकडे दूर्लक्ष करणं ही अनेकांची वाईट सवय बनलेली आहे. बऱ्याच वेळेस आपण इतरांना त्रास होईल किंवा उगाच डॉक्टरकडे जाऊन खर्च कशाला करायचा अशा समजूतीनुसार प्रकृतीच्या छोट्या-मोठ्या विकरांकडे लक्ष देत नाहीत. शरीर आपल्याला अनेक इशारे देत असतो, पण आपण त्याला भाव देत नाही. आपण गोष्टी ढकलण्याकडे जास्त लक्ष देतो. पण नंतर त्याचा त्रास सर्वांनाच होतो. आणि पैसाही जास्त खर्च होतो. जर आधीच वेळेवर स्वतःकडे लक्ष दिलं तर या गोष्टी टाळता येतात. उन्हाळ्यात घराचं छत शाकारलं तरच पावसाळ्यात ते गळत नाही अशा अर्थाची एक म्हण आहे. कारण मग नुसतंच पाणी नाहीतर अख्खं छतच गळून पडण्याची आपत्ती ओढवते.

दुसरीकडे काही लोकांना सवय असते की इतरांनी आपली काळजी घ्यावी. म्हणून ते स्वतः फार काही करत नाही. हेही चुकीचं आहे. प्रत्येकालाच आपापली कामं असतात. त्यामुळे ज्याने त्याने आधी आपली काळजी घेणे योग्य. प्रकरण गंभीर असेल तर बाकी लोक येतातच मदतीला. पण ती मदत निरुपयोगी ठरेपर्यंत जर आपण आपल्याकडे दूर्लक्ष केलं तर तेव्हा इतरांना दोष देण्यात काही अर्थ नसतो.

अनेकांना पाहिलंय की ज्यांनी ३०-४० वर्षे मरमर काम केलं आणि जेव्हा निवृत्त झाले तेव्हा आरामात जगण्याच्या ऐवजी आजारपणामुळे अकस्मात वारले. पण ते खरंच अकस्मात वारले का? मला वाटतं की आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मला खुपतंय मला दुखतंय माझ्याकडे लक्ष दे. पण आपण लक्ष देत नाही. आपलं पहिलं प्राधान्य आपण कामालाच देतो. काम महत्त्वाचंच आहे. त्यात वादच नाही. पण ते काम करणारा माणूस आधी महत्त्वाचा आहे. त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ते आपणच करायला पाहिजे. जर आपणच आपल्याला प्राधान्य दिलं नाही आपली काळजी घेतली नाही तर इतरांना तरी आपल्यासाठी काही करण्याची गरज का भासावी याचाही विचार करा. तेव्हा वेळीच जागे व्हा.

रोजचा एक ठराविक वेळ स्वतःच्या तब्येतीसाठी द्या. शारिरीक व्यायाम कराच पण मानसिक व्यायाम म्हणजे ध्यानधारणाही करा. चाळीशीनंतर महिन्यादोन महिन्यातून एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन चेक-अप करून घ्या. पैशाचा प्रश्न असेल तर निदान इतकं तरी करा की तुम्हाला काही त्रास असेल तर तेव्हा तरी न चूकता डॉक्टरकडे जा. आणि हो हेल्थ इन्शुरन्स काढायला विसरू नका. त्याची माहिती घरच्यांना द्या. रोजच्या जगण्यात काही तरी शिस्त लावून घ्या. जो पैसा कमवत आहात त्याचा उपभोग घेण्यासाठी तरी स्वतःकडे लक्ष द्या.

केकेच्या जाण्यामुळे मी सर्वांना एकाच सांगू इच्छितो की, केके हे नव्वदच्या पिढीतला एक उत्तम सांगितीक समज असलेला दमदार आवाजीचा गायक होता. त्यांचे सूर कायम आपल्या कानांत घुमत राहतील यात शंकाच नाही. त्यांना विनम्र आदरांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!