आठ वर्षाच्या चिमुरड्यानं आधी बाहुलीला दिली फाशी आणि नंतर स्वतः घेतला गळफास.

महाराष्ट्रातील पुण्यातील ८ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. ८ वर्षाच्या मुलाला मोबाईलवर हॉरर चित्रपट पाहण्याची आवड होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक हॉरर फिल्म पाहिली आणि खेळा-खेळात बाहुलीला फासावर लटकवले. त्यानंतर स्वतःही गळ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव परिसरात ८ वर्षीय निष्पाप कमल खेम सौद हा आई-वडील आणि भावंडांसोबत राहत होता. दुपारी त्याची आई घरातील कामात व्यस्त होती. भाऊ आणि बहीण अभ्यासात व्यस्त होते. तो खोलीत एकटाच मोबाइलवर इंग्रजी हॉरर फिल्म पाहत होता, त्यांच्या नजरेआड होता. काही वेळाने तो बहिणीच्या बाहुलीशी खेळू लागला.

खेळा-खेळात त्याने बाहुलीचा चेहरा काळ्या कपड्याने गुंडाळला आणि इंग्लिश चित्रपटात जे दृश्य पाहिले होते त्याच पद्धतीने त्याला सुळावर चढवले. हे सर्व केल्यानंतर कमलला समजले की, त्याच्या या कृतीमुळे ती बाहुली त्याला जगात एकटी सोडून देवाकडे गेली. लगेच कमलने खिडकीला दोरीने गळ्यात गळफास लावून आत्महत्या केली.

थोडा वेळ कोणालाच काही कळले नाही. आपले काम संपवून आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला दोरीला लटकलेला पहिला तेव्हा ती आपल्या मुलाला म्हणाली, कमल असे खेळ खेळू नकोस. असं म्हणत ती घाबरून त्याच्याजवळ गेली, तोपर्यंत कमलचा श्वास थांबला होता. याची माहिती शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना दिली. पुण्यातील थेरगाव इथली ही घटना आहे. सदर मुलाचं कुटुंब सोसायटीच्या पायऱ्यांखाली राहतं. मुलाचे वडील गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

तपास अधिकारी सत्यवान माने यांनी सांगितले की, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि कमलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात कमलने हा प्रकार हॉरर फिल्म पाहून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आमचा सल्ला आहे की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांपासून फोन दूर ठेवावा.

काय सांगतात मानसोपचार तज्ज्ञ ?

८ वर्षाच्या चिमुरड्याने केलेल्या या कृत्याचं विश्लेषण करताना औरंगाबाद मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे म्हणाले की-

▪️लहान मुलांसाठी त्यांची खेळणे म्हणजे ही वास्तव असते. आपण जे काही करतो, ते सगळं ते खेळणीसोबत खेळतात. त्यांना खाऊ घालतात, आंघोळ घालतात. कपडे घालतात.
▪️ सदर मुलाने जे मोबाइलमध्ये व्हिडिओ पाहिले, त्याचेच अनुकरण बाहुलीसोबत केले असावे. बाहुलीला लटकवल्यानंतर तिला काही झालं नाही, हे पाहून आपल्यालासुद्धा काही होणार नाही, असे मुलाला वाटले असावे. या विचारातून सुद्धा त्यानं गळफास घेतला असावा.
▪️६ ते १४ हा वयोगट सोशल इन्फ्यूएन्सचा काळ असतो. म्हणजेच समाजामध्ये आजू-बाजूला ज्या गोष्टी घडत असतात, ज्या गोष्टी त्याच्या पर्यंत पोहोचतात, त्याचाच मुलांवर जास्त परिणाम होतो. त्या मुलाने अश्याच प्रकारचे व्हिडिओ पाहीले असावे, त्यामुळेच त्याचं अनुकरण केलं असावं.

▪️६ ते १४ या वयाच्या सुरुवातीची ३-४ वर्ष तर समाजाचा प्रचंड प्रभाव मुलांवर असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्ती, गोष्टी यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. यामुळेच काही वर्षांपूर्वी शिनचॅन या कार्टून मालिकेवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली होती.
▪️आई-वडिलांना मुलांनी उलटून बोलणे, मस्करी म्हणून कोणत्याही पातळीवर जाणे हे मुलांवर प्रभाव करणारे ठरू लागले.
▪️हातात मोबाइल दिला की मुलं शांत बसतात, असं असलं तरी सुद्धा मुले मोबाइलवर काय बघतात किंवा मित्रांसोबत बाहेर खेळायला गेली तरी ती कुणासोबत आणि काय खेळतात, याकडे पालकांचं लक्ष असायला हवे. अर्थातच ते मुलांना कळू न देता किंवा त्यांच्यावर एकसारखी पाळत न ठेवता, मात्र ते कोणत्या संगतीत आहेत, हे जाणून घेणं पालकांसाठी गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!