तंबाखू-सिगारेट घेण्यापूर्वी जाणून घ्या मोदी सरकारचे नवीन नियम..

केंद्र सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांबाबत (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नवीन सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता तंबाखूजन्य पदार्थांवर नवीन फोटोसह आणखी कडक इशारा लिहिला जाणार आहे. आता सिगारेटच्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात ‘तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू’ आणि ‘तंबाखूच्या सेवनाने तरुण वयातच मृत्यू होतो’ असे लिहिणे बंधनकारक असेल. नवीन नियम 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील.

1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार नवीन नियम

मिळालेल्या बातमीनुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 21 जुलै रोजी सुधारित नियम जारी केले आहेत. नवीन नियम 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. याशिवाय, तंबाखू आजच सोडा, असे पॅकेटच्या मागील बाजूस काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरात लिहिलेले असेल. त्याच बरोबर तंबाखू जन्य उत्पादनाच्या प्रत्येक पाकिटवर 1800-11-2356 हा हेल्पलाईन नंबर लिहणे बंधनकारक असेल. ज्यांना तंबाखूचे व्यसन सोडण्याची ईच्छा असेल त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर काॅल करावा. त्या कॉलनंतर तुमचे समुपदेशन केले जाणार आहे.

अल्पवयीन व्यक्तीला तंबाखू विकल्यास दंड आणि कारावासाची तरतूद

हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोणत्याही प्रकारची तंबाखू किंवा त्यामध्ये असलेले कोणतेही पदार्थ अल्पवयीन व्यक्तीला विकणे हे बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 77 चे उल्लंघन आहे. या कायद्यांतर्गत आरोपींना 7 वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

जगभरात दरवर्षी होतो सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूचा वापर थांबवण्यासाठी दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या विशेष दिवशी लोकांना तंबाखूच्या धोक्याबद्दल जागरूक केले जाते.

Similar Posts