प्रतीक्षा संपली, 4 मे ला LIC चा IPO लाँच होणार, जाणून घ्या केव्हा लावू शकता बोली..
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC IPO) आयपीओ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहे. अहवालानुसार, LIC चा IPO 4 मे रोजी चालू होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत होते आणि आता गुंतवणूकदारांची ही प्रतीक्षा संपणार आहे. LIC च्या IPO मध्ये प्राइस बँड काय असेल याची माहिती अजून समोर आलेली नाही.
वृत्तानुसार, सरकार एक-दोन दिवसांत या IPO बद्दल प्राइस बँडसह इतर माहिती जाहीर करू शकते. या IPO चे आकारमान 21,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदार 9 मे पर्यंत LIC च्या IPO मध्ये बोली लावू शकतात. आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी २ मे रोजी उघडेल. सरकारने अलीकडेच SEBI कडे IPO साठी सुधारित DRHP सादर केला आहे.
सरकार 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे
LIC च्या या IPO मधील 3.5 टक्के हिस्सा भारत सरकार विकणार आहे. याआधी सरकार 5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत होते, पण आता एलआयसीचे केवळ 3.5 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने एलआयसीचे मूल्यांकन आणि विकल्या जाणार्या भागभांडवलात सुधारणा केली आहे कारण यापूर्वी बाजारात बरीच अस्थिरता होती. गुंतवणूकदारांकडून मागणी कमी असल्याच्या भीतीने विकला जाणारा हिस्सा कमी करण्यात आला आहे.
जर आपण LIC चे 6 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल बघितले तर अंदाजे इश्यू आकार 21,000 कोटी रुपये असेल. मात्र, सरकारची माहिती जाहीर झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल. LIC ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. त्यात सरकारचा 100% हिस्सा आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी कंपनीचे मूल्यांकन 12 लाख कोटी रुपये होते, जे आता निम्म्यावर आले आहे. अशा परिस्थितीत 6 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनातही 3.5 टक्के स्टेक विकण्याचे बोलले तर त्यातून सरकारला सुमारे 21 हजार कोटी रुपये मिळतील.
आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO
LIC चा IPO हा भारतातील सर्वात मोठा IPO असेल. यापूर्वी, पेटीएमचा आयपीओ सर्वात मोठा होता, जो सुमारे 18,300 कोटी रुपये होता. याशिवाय देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये कोल इंडिया (15,500 कोटी) आणि रिलायन्स पॉवर (11,700 कोटी) यांचाही समावेश आहे.