शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील..

राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती, तसेच कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. तर शाळांमध्ये पात्र मुलांच्या लसीकरणावर भर देतानाच करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शाळा सुरू होत्या.

मात्र ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून केवळ इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असून त्याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Similar Posts