पैठण नाथषष्ठी यात्रेत ६ महिलांसह २३ चोरट्यांना अटक; पैठण पोलीसांची मोठी कारवाई….

पैठण मध्ये नाथषष्ठीच्या निमित्त जमलेल्या भाविकांच्या गर्दीत त्यांना लुटण्यासाठी टपून बसलेल्या एक दोन नाही तर तब्बल २३ चोरट्यांना पैठण पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे यात्रेत वारकऱ्यांना लुटण्यासाठी आलेले चोरटे हे जालना, बीड, सोलापूर व हैदराबाद जिल्ह्यातून आले होते. मात्र पोलीसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वारकऱ्यांना नाथषष्ठीच्या यात्रेत चोरट्यांचा त्रास जाणवला नाही.

पैठण शहरामध्ये नाथषष्ठी यात्रेसाठी हजारो लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात, या गर्दीचा फायदा घेऊन वारकऱ्यांना लुटण्यासाठी विविध जिल्ह्यातील चोरटेही येत असतात. यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी चोरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश स्थानिक पोलीस यंत्रणेला दिले होते. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तैनात करण्यात आले होते.

बुधवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल २३ चोरटे पोलीसांनी पकडले. यामध्ये सहा महिला चोरांचा सुद्धा समावेश आहे

सतर्कतेचा भाग बनून गेल्या काही यात्रेमधील भुरट्या चोरट्यांचे फोटो विविध ठिकाणी लावण्यात आले होते. दर्शन रांगेसह विविध ठिकाणी CCTV द्वारे नजर ठेवण्यात आली होती. याशिवाय स्थानिक खबऱ्यांना सुद्धा कामाला लावण्यात आले होते.

Similar Posts