आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..
येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभाग शिक्षक, प्रशासक, कर्मचारी आणि शिपाई यांची चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे.
त्याबाबत लवकरच शालेय संस्थान आदेश देण्यात येणार असून आदेशाची अंमलबजावणी कशी होईल त्याकडे शिक्षण विभागा तर्फे लक्ष देण्यात येईल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्पष्ट केले.
आयुक्त सूरज मांढरे हे शिक्षण विभागाचा आढावा घेण्याकरीता औरंगाबाद शहरामध्ये येतील अशा सूचना कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आल्या होत्या. बुधवारी सूरज मांढरे औरंगाबाद शहरात आढावा बैठकीसाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर शाळांच्या कारभारावर प्रश्न निर्माण होत असताना शिक्षण विभाग अशा शाळांवर काय कारवाई करतो, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत असल्यामुळे शिक्षण विभाग शिक्षकांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करण्याबाबत विचार करत असून त्याची अंमलबजावणी नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जूनमध्ये सुरू होत असून त्यावेळीच हे बदल करण्यात येणार आहे.
खासगी शाळांत नव्या सत्रामध्ये शिक्षकांची नेमणूक करतावेळी तेथे नेमणूक करण्यात येणारा शिक्षक, त्याची संपूर्ण माहिती संस्थेकडे असावी, जसे की, त्याच्यावर काही पूर्वी गुन्ह्याची नोंद तर नाही ना. या संदर्भातील माहिती घेतली जाईल. शाळांत बसविण्यात येणारे CCTV कॅमेरे चालू आहेत की नाही, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी करावा याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मांढरे यांनी सांगितले.