दशक्रियाविधीकरीता पैठणला आलेल्या कुटुंबावर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी..
संभाजीनगर (औरंगाबाद) हून दशक्रिया विधी करण्यासाठी पैठणला गोदावरी नदीच्या मोक्षघाटावर आलेल्या कुटुंबावर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीच्या संशयावरुन हा सर्व प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहिवासी रामेश्वर गजानन फुटाणकर ( विश्रांतीनगर , मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, पुंडलिकनगर पोलीस स्टेशन समोर) यांच्या कुटुंबातील मृत व्यक्तीच्या अस्थीविसर्जनाकरीता गुरुवारी सकाळी गोदावरी नदी काठावर असलेल्या नाथ मंदिराच्यामागील मोक्षघाटावर आले होते. यावेळी गोदापात्रात अस्थी विसर्जन करीत असतांंना फुटाणकर यांच्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेली. यावेळी त्यांनी एका तरुणाला पोत चोरली असेल तर परत कर असे सांगितले. मात्र, तो तरुण पळून एका हॉटेलमध्ये घुसला तेव्हा फुटाणकर कुटुंबातील लोकांनी हॉटेलात जाऊन त्या तरुणांस पोत परत कर नसता पोलिसांत तक्रार करण्यात येईल असे सांगितले.
या कारणावरुन वाद सुरू झाला. संशयित पोत चोर व त्याचे कुटुंब यावेळी जमा झाले व तेथे जोरदार मारामारीस सुरुवात झाली. या हाणामारीत एका तरुणाने कोयत्याने हल्ला करत फुटाणकर कुटुंबातील संतोष गजानन फुटाणकर ( ४० ) व कुणाल रंगनाथ गाढेकर (३५) दोघे रा. विश्रांतीनगर या दोघांना गंभीर जखमी केले. संतोष यास डोक्यावर जबर मार लागल्यामुळे त्याची प्रकती गंभीर असून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पो. नि. किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ विकास ज्ञानेश्वर जाधव, अक्षय सोमनाथ घोडके, आकाश ज्ञानेश्वर जाधव ( सर्व रा. संतनगर पैठण), विशाल विठ्ठल घोडके ( रा. साठेनगर पैठण) या चार आरोपींना अटक केली असून रवी लक्ष्मण जगधणे हा आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी रामेश्वर गजानन फुटाणकर यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो. नि. किशोर पवार, उपनिरीक्षक सतिष भोसले, पो.हे.का. महेश माळी, पो. का. गोपाल पाटील, नरेंद्र अंधारे, अनिरुद्ध शिंदे, अंकुश शिंदे, गणेश कुलट आदी करीत आहे.
मोक्षघाट बनलाय असुरक्षित
पैठण येथील मोक्षघाटावर दशक्रिया विधीकरिता आलेल्या भाविकांना मारहाण करून लुटणे हा नेहमीचाच भाग झाला असून या मोक्षघाटावर गुन्हेगारांनी ताबा केल्याचे दिसत आहे.