जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, आयटीबीपीच्या 39 जवानांनी भरलेली बस नदीत पडली, 7 जवान शहीद तर 8 ची प्रकृती गंभीर..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे आयटीबीपीच्या जवानांनी भरलेली बस नदीत पडली आहे. या दुर्घटनेत 7 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली असून अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जवानांची प्रकृतीही चिंताजनक असल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी विमानाने श्रीनगरला हलवण्यात आले आहे.

ज्या बसचा अपघात झाला त्यात एकूण 39 जवान होते. यामध्ये 37 जवान आयटीबीपीचे आणि 2 जवान जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून हे जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. हे तेच सैनिक होते, जे अमरनाथ यात्रेत कर्तव्य बजावत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशा स्थितीत अशा धोकादायक ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

बचावकार्य सुरू
जवानांनी भरलेली बस नदीत पडल्याचे वृत्त समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. येथे लोकांची मोठी गर्दी दिसून येत असून जवानांना वाचवण्यासाठी बचाव कार्य केले जात आहे. जखमी झालेल्या सर्व जवानांना प्रथम पहलगाम येथील रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर अधिक गंभीर जखमींना श्रीनगरला नेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!