मुलांचा १२वीचा निकाल लागल्यावर पालकांनी कसं वागावे? लक्षात ठेवा ४ गोष्टी..
१०वी आणि १२वी हे आपल्या आयुष्यामधील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असल्यामुळे या वर्गात आपल्याला किती मार्क मिळतील यावर आपल्या भावी करिअरची दिशा निश्चित होणार असते. हे जरी सत्य असले तरी या निकालाचा मर्यादेपेक्षा जास्त ताण घेणे आणि त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याची आवश्यकता नाही.
आपल्या मुलाची बुद्धिमत्ता आणि त्याने घेतलेले अपार कष्ट यावर मिळणारे गुण अवलंबून असतात. त्यामुळे या निकालाचा जास्त बाऊ न करून त्याला सामोरे जाणे गरजेचे हे खूप आहे. या करिता पालकांना काही गोष्टी स्पष्ट असणे आवश्यक आहे.
१) आपल्या पाल्याच्या जो निकाल आहे तो लागणारच आहे. त्यामुळे त्याला त्याचा ताण आला असेल तर तो येऊ नये याकरिता प्रयत्न करणे. यासाठी मुलांशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत रिझल्ट सोडून वेगळ्या विषयांवर गप्पा मारणे अत्याआवश्यक आहे. शिवाय पाल्याला जास्तच ताण आला असल्यास त्याला बाहेर फिरायला नेणे, त्याच्या आवडीचे खायला देणे या गोष्टी पालकांनी कराव्यात.
२) 12वीचा निकाल हा पाल्यांच्या आयुष्यामधील महत्त्वाचा टप्पा जरी असला तरी एकमेव हाच टप्पा आहे असे मुळीच नाही. त्यामुळे आता जरी कमी गुण मिळाले तरी खचून न जाता पुढे हमखास यश मिळेल याची खात्री मुलांना देणे ही पालकांची महत्त्वाची भूमिका ठरू शकते. बऱ्याचदा पालक गुणांबाबत जास्त कठोर वागत असतील तर कमी गुण मिळाल्यावर घाबरुन चुकीचे पाऊल उचलण्याची जास्त शक्यता असते. असे होऊ नये याकरीता पालकांनी पाल्याशी मोकळा संवाद ठेवायला हवा.
३) पालकांची अपेक्षा जास्त मार्क मिळण्याची असणे स्वाभाविकच आहे. मात्र आपल्या मुलाची बुद्धिमत्ता, तो घेत असलेले कष्ट यांचा पालकांना अंदाज असल्याने त्यांवी त्यापेक्षा जास्त अपेक्षा न करता मुलाच्या गुणवत्तेचा विचार करुनच मुलां-कडून अपेक्षा ठेवायला हव्यात. अन्यथा मुलांवर त्याचे दडपण येऊन मुले मानसिक-रित्या खचू शकतात. तसेच परिक्षेच्या वेळी किंवा वर्षभर त्यांना अभ्यास करायला लावणे ठिक आहे पण निकालाच्या वेळी आपल्या अपेक्षा बोलून दाखवणे मुलांना नक्कीच खचवणारे ठरु शकते.
४) प्रसिद्ध मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या की, मुलांच्या निकाला-बाबत पूर्वीपेक्षा पालकांची मानसिकता बरीच बदलली आहे. मात्र आपल्या मुलाचा निकाल इतरांना सांगायची वेळ येते तेव्हा तो कमी असला तेव्हा मात्र पालक दु:खी होतात. आणि तेव्हा इतर मुलांशी नकळत आपल्या पाल्याची तुलना केली जाते, पण असे होता कामा नये. कोरोना काळामुळे मागील दोन वर्षात बरीच सूट मिळाली आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाइन अभ्यास केल्याने मार्क कमी असतील अथवा अपेक्षेपेक्षा जास्त असतील तर त्यांचा कल लक्षात घेऊन मगच पुढच्या करिअरची दिशा ठरवायला हवी.