अजिंठा घाटामध्ये मिनी व्हॅन व आयशरच्या अपघातात पाच पर्यटक जखमी..

अजिंठा लेणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मिनी व्हॅन व आयशरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच पर्यटक जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी (दि. २) दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास फर्दापूर-अजिंठा घाटामध्ये घडली. या अपघातात पर्यटकांच्या मिनी व्हॅनच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला आहे, जखमी पर्यटकांवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

विदर्भामध्ये नागपंचमीची सुटी असल्याने बुलडाणा जिल्ह्यामधील चिखली येथील जण मिनी व्हॅन (क्र. MH 21 V 4245) अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी निघाले होते. मंगळवारी दुपारी जळगावहून बंगळुरू येथे खुर्च्या घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MH 19 CY 0196 हा अजिंठा घाटातील एका अवघड वळणावर पर्यटकांच्या मिनी व्हॅनला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चालक विजय किसन नेमाणे, सोहम मुळे, नितीन नरवडे, गोपाल गायकवाड, आदित्य नरवडे (सर्व रा. शिरोडी, ता. चिखली, जि. बुलडाणा) हे पाच पर्यटक किरकोळ जखमी झाले.

दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावर आडवी झाल्याने घाटातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले, पोलिस नाईक नीलेश लोखंडे, योगेश कोळी, प्रदीप बेदरकर यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी पर्यटकांना तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!