विजेची तार ओढताना शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना
पोटाची खळगी भागवण्यासाठी वीज तार ओढण्याचे काम करताना तार वीज प्रवाह असलेल्या वायरवर पडल्याने शाॅक लागून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे आज दुपारच्या सुमारास घडली.
यात गणेश कारभारी थेटे (35) भारत बाबुराव वरकड (35) जगदीश मुरकुंडे (40), अर्जुन वाळु मगर (26, सर्व रा. नावडी) असे मृतांची नावे आहेत. विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करताना अचानक विद्युत तारेत प्रवाह आल्याने या सर्वांचा मृत्यू झाला. ते कन्नड तालुक्यातील नावडी येथील होते. ही बातमी कळताच गावावर शोककळा पसरली
सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यामधील हिवरखेडा नांदगीर वाडी शिवारामध्ये हे चार जण विद्युत पोल उभे करण्याचे काम करत होते. त्या पोलवर नवीन तार ओढण्याचे काम चालु होते. यावेळी अचानक तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
…आणि चौघांनाही शॉक बसला – हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात चार जण विद्युत पोलवर नवीन तार ओढण्याचे काम करत असताना तिथे विद्युत प्रवाह नव्हता. मात्र 300 फुट अंतरावरुन एका शेतकऱ्याने वायर टाकुन लाईट नेलेली होती. आणि तार ओढत असताना ती तार नेमकी त्याच केबलवर पडून ती तार वायरला चिटकली आणि विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. यातच शॉक लागून 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल मागवला जाणार असल्याची माहिती महावितरण अभियंत्यांनी दिली.