एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..
तक्रार प्राप्त झाल्यावर एफआयआर (FIR) नोंदविल्या बिगर पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी (Inquiry) पोलीस ठाण्यामध्ये बोलावू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने (Dilli High Court) दिला आहे.
सीआरपीसी (CrPC) च्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले 3 समन्स रद्द करत असताना दिल्ली उच्च न्यायालयातर्फे हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चंद्रधारी सिंह यांनी यासंदर्भात निकाल दिला असून फौजदारी दंड संहितेच्या तरतुदीनुसार तक्रारीची चौकशी करणार्या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने सीआरपीसी (CrPC) च्या कलम 160 अंतर्गत समन्स जारी केल्या जाऊ शकतात, परंतु तपास सुरू होण्यापूर्वी FIR नोंदवणे आवश्यक आहे, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सीआरपीसी (CrPC) च्या तरतुदींप्रमाणे काम करणे आवश्यक.
दिल्ली उच्च न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या सीआरपिसी (CrPC) च्या कलम 160 मधील तरतुदींचा तपशीलवार हवाला दिलेला आहे. त्या हवल्यांच्या आधारे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी निकालपत्रात म्हटले की, एफआईआर (FIR) नोंदवल्या शिवाय तपास सुरू केला जाऊच शकत नाही. तपास कायदेशीर आणि वैध होण्याकरिता पोलीस अधिकाऱ्याने सीआरपीसीच्या (CrPC) तरतुदींप्रमाणे काम केले पाहिजे. एवढेच नव्हे तर, दंडाधिकाऱ्याला अहवाल न देता केवळ प्राथमिक चौकशी करून पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकाराबाहेर काम करूच शकत नाही, असे स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
पंजाब पोलिसांनी तीन वेळेस जारी केले होते समन्स
फ्रँकफिन एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक कुलविंदर सिंग कोहली यांच्या याचिकेवर सुनावणी करीत असताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. कोहली यांनी एका अर्जाच्या तपासामध्ये सायबर क्राईम, एसएएस नगर यांनी जारी केलेल्या समन्सला न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने कुलविंदर सिंग कोहली यांच्याविरुद्ध सीआरपीसी (CrPC) च्या कलम 160 अंतर्गत 25 जानेवारी 2022, 25 फेब्रुवारी 2022 आणि 9 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आलेले समन्स रद्द केले आहे. कुलविंदर सिंग यांनी मोहालीच्या एसएएस नगर येठील पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेल्या समन्सला न्यायालयात आव्हान देतांना समन्स रद्द करण्याची मागणी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
याचिकाकर्ते कुलविंदर सिंग कोहली हे दिल्ली येथील रहिवासी असून व्यवसायाने वकील (advocate) आहेत. त्यांच्या विरुद्ध तक्रारीच्या तपासा संदर्भामध्ये पंजाब पोलिसांनी त्यांना सायबर सेल पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश दिलेले होते. कोहली यांच्याविरुद्ध राजबिक्रमदीप सिंग आणि त्यांचा मुलगा मुंजनप्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर बाबा जगरूप सिंग यांच्या मृत्यूबाबत खोटे आरोप आणि ज्योतदीप सिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.