1 जुलैपासून अनेक आर्थिक बदल होण्याची शक्यता, तुमच्या खिशावर होईल परिणाम?
1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान होणार असून, 1 तारखेपासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांना 1% TDS भरावा लागेल..
जुलै महिना सुरू होण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. दर महिन्याला नवे आर्थिक बदल लागू होत असतात आणि हे बदल तुमच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करतात. म्हणूनच हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असते, जेणेकरून तुम्ही त्यासाठी तयार राहाल.
🖇️ पॅन-आधार लिंक (PAN-Aadhar Link)
जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी पॅन-आधारशी लिंक केला तर त्याकरिता 500 रुपये आकारले जाईल. पण जर का 1 जुलै 2022 रोजी अथवा त्यानंतर पॅन-आधार लिंक करण्याकरीता दुप्पट म्हणजेच 1,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.
क्रिप्टो-करन्सीवर TDS
1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सी मध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे. 1 जुलै पासून, सर्व प्रकारच्या क्रिप्टो व्यवहारासाठी 1 टक्का TDS भरावा लागेल, मग क्रिप्टोकरन्सी नफ्यात विकता किंवा तोट्यामध्ये विकता याचा कोणताही संबंध नाही. शिवाय क्रिप्टोकरन्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही 30% कर लागू झाला आहे.
एसी महागणार
1 जुलैपासून एअर कंडिशनरसुद्धा (AC) महागणार आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) ने एसीसाठी ऊर्जा रेटिंगचे नियम बदलले असून ते 1 जुलैपासून लागू होतील. याचा अर्थ असा की, 1 जुलैपासून 5 ⭐ स्टार एसीचे रेटिंग थेट 4 स्टारवर जाईल. अशा परिस्थितीत एसीच्या किमती 7 ते 10 % वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गॅस सिलेंडर
दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, कपात किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार असे होऊ शकते की, 1 जुलैला सिलेंडर महाग होईल.. सिलेंडर स्वस्त होण्याची अपेक्षा कमी आहे.
पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर
पोस्ट ऑफिस योजनांचे नवीन व्याजदर प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीस लागू होतात. त्यात सुद्धा बदल होण्याची दाट शक्यता आहे. पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदरात वाढ, कपात किंवा आहे ते व्याज दर कायम राहण्याचीही शक्यता आहे. नवीन तिमाही 1 जुलैपासून सुरू होत असून नवीन दर जारी होऊ शकतात.
सध्या, PPF वर 7.10 %, NSC वर 6.8 %, मासिक उत्पन्न योजना खात्यावर 6.6 %, 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 %, किसान विकास पत्रावर 6.9 % आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 % व्याजदर आहे.