बनावट व्हॉटसॲप खाते तयार करून महिला व पुरूषांचे अश्लिल फोटो गावक-यांना पाठवणारा गजाआड.

शिवना: दिनांक १४/०६/२०२२ रोजी एक पुरुष तक्रारदार यांने पोलीस ठाणे सायबर येथे तक्रार दिली की, त्यांचे नावावरील मोबाईल सिमकार्ड गहाळ झाले होते. नमूद गहाळ झालेल्या सिमकार्ड नंबरचा वापर करून अज्ञात इसमाने बनावट व्हॉट्सॲप खाते तयार करून शिवना गावातील महिला व पुरुषांना त्यांचे व्हॉटसॲप खात्यावर अज्ञात महिलांचे व पुरुषांचे अश्लिल फोटो पाठविले अशी तक्रार केली होती.

तसेच दिनांक १६/०६/२०२२ रोजी एक महिला तक्रारदार यांनी पण तिचे फोटोचा अज्ञात इसमाने व्हॉटसॲप खात्याचे डीपीला वापर करून तिचे तसेच गावातील इतर व्यक्तींचे व्हॉटसॲप खात्यावर अज्ञात महिला व पुरुषांचे अश्लिल फोटो पाठवलेबाबत तक्रार दिली होती.

नमूद दोन्ही तक्रारीचे अनुषंगाने पोस्टे सायबर औरंगाबाद ग्रामीण येथे दोन वेगवेगळे गुन्हे गुरनं. २१/२०२२ कलम ६६ (सी), ६७(अ) आयटी ॲक्ट व गुरनं. २२/२०२२, कलम ३५४ (ड) (१) (२) भादवीसह कलम ६६ (सी), ६७(अ) आयटी ॲक्ट प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते.

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधिक्षक यांनी नमूद दोन्ही गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून, आरोपीस जेरबंद करण्याबाबत सुचना दिल्याने सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी नमूद दोन्ही गुन्हयातील गहाळ मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसॲप खात्याचा वापरकर्ता याचे बाबत सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तब्बल 8 दिवस सायबर पोलिसांनी त्या नंबर बद्दल सर्व माहिती गोळा केल्यावर पोलिसांच्या तपासात अभिषेक चे नाव समोर आले. त्यांनतर पोलिसांनी सापळा रचून साध्या वेशात अभिषेकचे घर गाठले. तेव्हा अभिषेक एका किराणा दुकानावर उभा होता. तेथेच त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

असा अडकला…

अभिषेकला काही दिवसांपुर्वी सीम कार्ड बसस्थानकावर सापडले. त्याने आधी स्वत:च्या मोबाईल मध्ये सिमकार्ड टाकून त्याचा नंबर जाणुन घेतला. त्यानंतर लहान बहिणीला मोबाईल वापरण्यासाठी घेतला. त्यावर त्या क्रमांकाने व्हॉटस्ॲप इंस्टॉल करुन विकृत चाळे सुरू केले. सुरवातीला नंबर जाणून घेण्यासाठी त्याने सिमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकला आणि तो तिथेच फसला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे अभिषेकवर जालना पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल आहे

दोन्ही गुन्ह्या तील समानदुवे यांचा तपास करून नमूद गुन्हा हा अभिषेक अशोक वाघ वय २० पोस्टे सायबरच्या टीमने गुन्हयात वापरलेले दोन मोबाईल फोन तसेच तक्रारदार याचे गहाळ झालेले मोबाईल फोन क्रमांकाचे व्हॉटसॲप खाते त्याचे मोबाईल फोनमध्ये चालू असल्याचे तसेच त्याने पाठवलेले अश्लिल व्हॉटसॲप मेसेजचे फोटो त्याचे मोबाईलमध्ये मिळून आल्याने आरोपी अभिषेक अशोक वाघ यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सायबर पोलीस, औरंगाबाद ग्रामीण करित आहे.

मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, अशा प्रकारे कोणी इसम हा सर्वसामान्य नागरीक, महिला / मुलींना त्रास देत असेल, तर त्यांनी निर्भीडपणे तक्रार करावी. कोणत्याही भीतीने चूप राहू नये. अशी कुठलीही तक्रार असल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क साधावा.

नमूदची कामगिरी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र निकाळजे, पोनि श्री. भारत माने, पोउपनि, पोह/ कैलास कामठे, संदिप वरपे, नितिन जाधव, रविंद्र लोखंडे, मुकेश वाघ, लखन पचोळे, गणेश नेहरकर, योगेश दारवंटे, सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!