मान्सूनसाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस…
शनिवारी दिनांक ११ जून २०२२ रोजी मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. काल दिवसभरातमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. आज मान्सूनच्या रेषेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासाकरीता महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशामध्ये पोषक हवामान तयार झालेले असून येणाऱ्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यात मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
होसाळीकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आज मान्सून रेषेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र उत्तर अरबी समुद्र, कोकणामधील उर्वरित भाग, गुजरातमधील काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागर परिसरामध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार झालेलं आहे. मराठवाड्यात सुद्धा मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार झालेलं आहे. येत्या चोवीस तासात या ठिकाणी मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
हवामान खात्याने आज दक्षिण मराठवाड्यामधील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील दोन ते तीन तासांमध्ये औरंगाबाद, ठाणे, रायगड आणि जळगाव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.
दरम्यान औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता असून वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
IMD कडून पुढील 5 दिवसांसाठी महाराष्ट्रासाठी हवामान अलर्ट्स …
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 12, 2022
मराठवाड्यामध्ये इतर ठिकाणी ढगाळ हवामान
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळलेला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्यामुळे मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्याजोरदार सरी बरसत आहेत, तर काही भागात फक्त ढग जमा झाले आहेत. पण अद्यापपर्यंत मराठवाड्यात मान्सून दाखल झालेला नाही.