घरातील सर्व कामे करूनसुद्धा नेहमी टोमणे मारणाऱ्या सासूच्या डोक्यात लाकडाचा दांडा मारून सुनेने यमसदनी पाठवल्याची घटना आज बुधवारी दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ९:३० सुमारास पाटेगाव ता. पैठण येथे घडली. कौसाबाई अंबादास हरवणे वय ४८ वर्षे असे हत्या झालेल्या सासूचे नाव असून या प्रकरणी कांचना गणेश हरवणे वय ३५ वर्षे हिला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पैठण पासून जवळच असलेल्या पाटेगाव परिसरामधील दादेगाव रोडवर असलेल्या हरवणे वस्तीवर कौसाबाई हरवणे कुटुंबासह राहत होते. गावात शेतात गवत कापण्यावरून काल मंगळवारी कौसाबाई आणि कांचन यांच्यात वाद झाला होता. तसेच कौसाबाई आणि त्यांची सून कांचन यांच्यात सतत छोट्या-मोठ्या गोष्ठीवरून वाद व्हायचे. त्यामुळे कांचनच्या मानत सासूबाबत प्रचंड राग होता. कांचनचे सासरे अंबादास हरवणे दूध टाकण्यासाठी बाहेर गेले असता कांचन ने संधी साधून स्वयंपाक करत असलेल्या सासूच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. सासू कौसाबाईच्या डोक्यावर जोराचा वार बसल्याने मोठी दुखापत होऊन त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
सदरील घटना घरातील एका लहान मुलीने दुसऱ्या वस्तीवरील आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यांनी लगेच जखमी कौसाबाईला पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कौसाबाईला तपासून मृत घोषित केले.

कांचनने कौसाबाईला एवढे मारले की, स्वयंपाक घरात चक्क रक्ताचा सडा पडला होता. हे पाहून पोलिससुद्धा चक्रावले होते.
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, बीट जमादार चैडे, भागिले, सचिन भुमे, सुनील कानडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आणि आरोपी कांचनाला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.