औरंगाबादमधील पुंडलिक नगर येथे आज सकाळी घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. वडील शामसुंदर हिरालाल कलंत्री व सावत्र आई किरण शामसुंदर कलंत्री या दाम्पत्याचा खून त्यांच्याच मुलाने केवळ ७०० रुपयांसाठी केला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
वडिलांसह सावत्र आईचा खून करून फरार झालेल्या संशयित खुनी मुलाला खून उघडकीस आल्यापासून अवघ्या सात तासांच्या आत अटक करण्यात औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. तो शिर्डीमध्ये एका हॉटेलात दडून बसला होता.
सतत होणाऱ्या खुनांच्या दहशतीमध्ये असलेले औरंगाबाद शहर आज, पुन्हा एका दुहेरी हत्येने हादरले होते. सोमवारी (दि. २३) सकाळीच पुंडलिकनगर मधील गल्ली नंबर ४ मध्ये राहणाऱ्या कलंत्री दाम्पत्याचा मृतदेह त्यांच्या घरात वेग-वेगळ्या मजल्यावर पलंगाखाली आणि कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता. त्यांचा मुलगा रहस्यमयरित्या गायब असल्याने त्यानेच हा खून केल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुंडलिकनगर मध्ये शामसुंदर कलंत्री यांचे भांड्याचे दुकान आहे. शनिवारी मुलगा आकाश याने हिशोबात घोळ केल्याचे हिरालाल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ७०० रुपयांचा जाब आकाशला विचारला. यातून बाप-लेकात वाद झाले.
फक्त ७०० रुपयांसाठी वडिलांनी घातलेला वादामुळे संतापलेल्या आकाशाने हिरालाल व सावत्र आई किरण कलंत्री यांची धारदार शस्त्राने हत्या केली. यानंतर दोघांचे मृतदेह वेग-वेगळ्या मजल्यावर असलेल्या पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला.
पोलिसांनी तांत्रिक तपास करून आकाशचे लोकेशन ट्रेस केले असता तो शिर्डी येथे असल्याचे निदर्शनास झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत लागलीच आकाशला ताब्यात घेतले.